Amerca-Israel vs Iran War: अमेरिकेकडून होर्मूझची नाकेबंदी कायम असल्याने इराणने व्यापारी जहाजांना वाहतूक करण्यास मुभा देणारा निर्णय मागे घेतला. त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान इराणच्या वार्ताकार शिष्टमंडातील एक सदस्याने इराणला कायमची शांतता हवी आहे, असे सांगितले आहे.
इराणी सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, युद्धविरामाची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर घालिबाफ यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत हे विधान केले होते, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे. ते म्हणाले की, “आमच्यासाठी सर्वात मूलभूत बाब म्हणजे अमेरिकेबद्दलचा अविश्वास,” “त्याच वेळी, आमचे हेतू नेक आहेत आणि आम्ही कायमस्वरूपी शांततेच्या शोधात आहोत, अशी शांतता जी युद्धाची पुनरावृत्ती रोखेल.” असे ते म्हणाले होते.
लेबनानी सैन्याकडून दक्षिण भागातील रस्ते खुले
दरम्यान इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील १० दिवसाच्या युद्धविरामानंतर लेबनीज सैन्याने जाहीर केले आहे की, त्यांनी ‘खरदाली’ रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे; हा रस्ता दक्षिणेकडील ‘नबातीयेह’ शहराला ‘मरजायून’ या नगराशी जोडतो. ‘टायर’ या बंदर शहराला ‘बुर्ज रहहाल’ या गावाशी जोडणारा रस्ताही पुन्हा खुला करण्यात आला आहे. तसेच, ‘टायर फिल्से’ गावातील ‘लिटानी’ नदीवरील पुलासह इतर रस्ते पुन्हा खुले करण्याच्या कामातही सैन्य सध्या व्यस्त आहे. असे एपी वृत्त संस्थेने वृत्त दिले. मागील गुरुवारी अमेरिकेच्या आणी पाकिस्तानच्या मध्यस्थीने लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात १० दिवसांचा सीसफायर झाला होता. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
गेल्या काही आठवड्यांत इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर केलेल्या आक्रमणादरम्यान, इस्रायली हवाई दलाने या नदीवरील अनेक पूल उद्ध्वस्त केले होते. त्याठिकाणी दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी लेबनॉन सैन्याने प्रयत्न सुरू केला आहे, दक्षिण लेबनॉन मधील पुलंचा यात समावेश आहे.






