Rajya Sabha Election : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेमुळे (शिंदे गट) हा ट्विस्ट आला असून आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदेंच्या शिवसेनेने 2 उमेदवार देण्याऐवजी एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला. तर रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील एकूण सात जागांसाठी सात अर्ज दाखल झाले. त्यामुळे बिनविरोध निवडीची औपचारिकता शिल्लक आहे.
या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त तीन मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दुसरा उमेदवार देणार आणि शरद पवारांपुढे आव्हान निर्माण करणार असं चित्र होतं. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नाही आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार, भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे.
शरद पवार-पार्थ पवारांचे दोन अर्ज
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकादा अर्ज जरी चुकून बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहणार आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सात उमेदवार
भाजपचे उमेदवार – रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते.
शिवसेना शिंदे गट- ज्योती वाघमारे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- पार्थ पवार.
महाविकास आघाडी – शरद पवार.









