Nashik Crime Update: महिला लैंगिक शोषणाचे एका मागून एक प्रकरणे उघड होत आहे, अशोक खरात प्रकरण, एरंडे आणि टीसीएस प्रकरण ताजे असतांनाच आणखी एका भोंदूबाबाचे पितळ ‘अनिस’च्या मदतीने पोलिसांनी उघड केले आहे. आता निफाड तालुक्यातील धरणगाव येथील एका भोंदूबाबाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. त्याचे काळे कृत्य उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे, भूतबाधा उतरवणे आणि कौटुंबिक समस्या दूर करण्याच्या नावाखाली एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
प्रकरण असे आहे
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, एका पीडितेल कौटुंबिक समस्या होत्या, घरगुती ताणतणाव आणि मुलीच्या लग्नात अडथळे येत होते, त्यामुळे या सर्व कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्या निफाड येथील धरणगाव खडक येथील महेशगिरी महाराज याच्या मठात गेल्या. यावेळी भोंदू महेशगिरीने महिलेला बाहेरची बाधा असल्याचे सांगून भीती घातली. धार्मिक विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात स्नान करण्यास सांगून, ओल्या वस्त्रातच उंबराच्या झाडाला फेऱ्या घालण्यास सांगितले.
दरम्यान काही दिवस लोटल्यावर भोंदूने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली. दैवी विधीसाठी एकांतात यावे लागेल, असे सांगून पीडित महिलेला नाशिकमध्ये बोलावले, नाशिक-त्र्यंबक रोडवर एका लॉजवर नेले, आणी माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, अशी धमकी देत त्याने अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. या सर्व प्रकाराने पीडित फार घाबरली.
भोंदूच्या दहशतीमुळे पीडिता गप्प होती, मात्र थोडा धीर धरून तीने सर्व हकीकत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांना संपर्क करून सांगितली. त्यानंतर अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे आणि डॉ. टी. आर. गोराणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घातली असता, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून, लासलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ महेशगिरी काकडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला गती दिली असून आणखी या भोंदूने कोणाला आपल्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केले आहे का? याचा तपास पोलीस करत असून या भोंदूला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी ‘अंनिस’ने केली आहे.









