होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ऐतिहासिक सफर: मनपा विद्यार्थ्यांची भरारी, इस्रो दरबारी!

On: April 24, 2026 12:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: ज्या नाशिकने देशाला संस्कृतीचे “माहेर घर” आणि उद्योगांची ‘यंत्रभूमी’ म्हणून आपली ओळख दिली, त्याच नाशिकचे विद्यार्थी आता अंतराळ विज्ञानाच्या जगात आपली मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बदलत्या तांत्रिक युगात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी आणि अवकाश संशोधनासारख्या प्रगत क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी, या उदात्त उद्देशाने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाने आयोजित ‘मनपा विद्यार्थ्यांची भरारी, इस्रो दरबारी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासोबतच शहराच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे मत महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनी व्यक्त केले.

नाशिक महानगरपालिकेच्या २६ गुणवंत विद्यार्थ्यांची ऐतिहासिक ‘इस्रो’ विज्ञान सफर विमानाने होणार असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनपा मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले होते. इस्रोला जाणारे हे २६ विद्यार्थी भविष्यात देशाच्या संरक्षण, विज्ञान किंवा प्रशासकीय सेवेत मोठ्या पदांवर काम करताना दिसतील. या अनुभवातून त्यांना मिळालेली ऊर्जा त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यक्त केला.

मनपा शाळांतील इयत्ता ७ वी ते ९ वीच्या निवडक २६ विद्यार्थ्यांचा चमू दि. २३ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) भेट देण्यासाठी विमानाने रवाना झाला आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व CSR भागीदारांचे आभार यावेळी मान्यवरांच्या वतीने मानण्यात आले.

अशी झाली विद्यार्थ्यांची निवड

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आले होते. सुरुवातीला १४ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करून या मोहिमेची आखणी करण्यात आली. त्यानंतर नाशिक मनपा क्षेत्रातील ११८४ हून अधिक विद्यार्थ्यांनी या सहलीसाठी उत्साहाने नोंदणी केली. १ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील १४ केंद्रांवर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली, ज्यातून १०१ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली. जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या सखोल मुलाखत प्रक्रियेनंतर गुणवत्तेच्या आधारावर अंतिम २६ विद्यार्थ्यांची या यंत्र भूमी ते अंतराळ भूमी सहलीसाठी निवड करण्यात आली. या सहलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण उपक्रम नाशिक महानगरपालिका आणि क्रेडाई (CREDAI) नाशिक, रामचित्रा हसमतराय फाउंडेशन, मुंबई व मिलन रेक्झिन यांच्या CSR (सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून राबवला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विमानाने जाण्या-येण्याचा, राहण्याचा आणि फिरण्याचा सर्व खर्च मोफत उपलब्ध करून देण्यात आला असून, आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही गुणवंत विद्यार्थी या संधीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

अभिनव उपक्रमामुळे मुलांच्या स्वप्नांना पंख मिळाले – पालक

यावेळी पालकांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, आजवर विमानाने प्रवास करणे किंवा इस्रोसारख्या ठिकाणी जाणे हे आमच्यासाठी केवळ स्वप्न होते. पण मनपाच्या या अभिनव उपक्रमामुळे आमच्या मुलांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने पंख मिळाले आहेत. आम्ही महानगरपालिकेचे अत्यंत ऋणी आहोत.

करिअरला नवी दिशा देणारा उपक्रम डॉ.मिता चौधरी

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. विविध संस्थेच्या सहकार्याने आयोजित ही सहल केवळ सहलीपुरती मर्यादित नसून ती विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ मिता चौधरी यांनी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, रमेश अडवाणी, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभिरे,चंद्रकांत गायकवाड, उपशिक्षक उज्वला कोठुळे रजनीकांत भदाणे, प्रल्हाद हंकारे, विशेष शिक्षक आणि महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment