America- Israel vs Iran Conflict: इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रखडलेल्या शांतता चर्चेसाठी वॉशिंग्टनला जबाबदार धरले आहे. अमेरिकेने देशाच्या बंदरांवर घातलेली नौदल नाकेबंदी हा एक प्रमुख अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, समुद्रातील तणाव वाढला असून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दोन परदेशी जहाजे ताब्यात घेतली आहेत आणि तिसऱ्या जहाजावर गोळीबार केला आहे, तसेच इराणचे संसदीय अध्यक्ष म्हणाले,की “होर्मुझ पुन्हा उघडणे ‘शक्य नाही” त्यामुळे दोन्ही बाजू आपल्या मतांवर ठाम राहिल्याने होर्मुचा गुंता कायम आहे.
दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, तेहरानला “संवाद आणि करार” दोन्ही हवा आहे, पण “वचनांचे उल्लंघन, नाकेबंदी आणि धमक्या” या वाटाघाटीत अडथळा आणत आहेत. तर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लिव्हिट यांनी यावर जोर दिला की, या वेळेचा निर्णय अध्यक्षांचा असेल.असे त्या म्हणाल्या. (America- Israel vs Iran Conflict)
दरम्यान होर्मुझ पुन्हा उघडणे ‘शक्य नाही’: इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले की, जोपर्यंत अमेरिकेची नौदल नाकेबंदी कायम आहे, तोपर्यंत त्यांचा देश होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणार नाही. त्यांनी या नाकेबंदीला दोन्ही देशांमधील युद्धविरामाचे “उघड उल्लंघन” म्हटले आहे. असे वृत्त अल जंजिराने दिले आहे. इराणच्या आयआरजीसीने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन परदेशी जहाजे ताब्यात घेतल्याची आणि जलमार्गातून जाणाऱ्या जहाजांवरील निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल तिसऱ्या जहाजावर गोळीबार केल्याची माहिती दिली.(America- Israel vs Iran Conflict)










