Ashok Kharat Crime Case : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केले, त्याच्यावर तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत, यापूवीच्या गुन्ह्यातील त्याची कोठडी संपल्याने त्याला सहाव्या प्रकरणात आज न्यायालयाने हजर करण्यात आले होते. महिला अत्याचार प्रकरणातील या सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) खरातचा ताबा घेतला, तसेच या प्रकरणी त्याला तीन दिवसांची म्हणजे दि. २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मागील गुन्ह्याची सुनावणी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली होती. या भोंदूबाबाची मागील गुन्ह्यातील कोठडी संपल्याने आज (VC) द्वारे न्यायालयात हजर केले होते. दरम्यान कॅनडा कॉर्नर परिसरातील ऑफिसमध्ये एका महिलेला गुंगीचे औषध आणि पेढा खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा अशोक खरात यांच्यावर दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपासासाठी ‘एसआयटी’ने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला.
न्यायालयात युक्तिवाद करतांना सरकारी वकीलांनी सांगितले की, महिला अत्याचार प्रकरणी हा महत्त्वाचा गुन्हा असून खरात हा पीडित महिलेला घाबरवत होता. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, असे पीडिताला त्याने सांगून घाबरविले तसेच तिच्या वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून फायदा उचलाला. पीडितेला पाणी, पेढे खाऊ घातले, त्याने आणखी काय काय केले आहे, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र आरोपीचे वकील न्यायालयात संतापले, या केसमध्ये देखील तेच पाणी, तेच पेढे आहेत,एसआयटीला अजून काही सापडलं नाही का? असा प्रश्न केला. प्रत्येकवेळी तीच कारणे सांगितली जाऊन कोठडी मागितली जात आहे, असे सांगून सरकारी पक्षाच्या मागणीला विरोध केला.
सरकारी पक्षाने प्रत्येक गुन्ह्यात पीडित महिला वेगळी आहे.असे सांगून तपासासाठी आरोपीचा प्रत्यक्ष ताबा हवा आहे. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकला आणि अशोक खरात याला न्यायालयाने २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.








