Nashik News: मानवी जीवनाचे सत्य शोधण्याचा ध्यास घेऊन भगवान बुध्द यांनी स्वीकारलेला मार्ग हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा त्याग आहे. ‘तमसौ मा ज्योतीर्गमय’ असा हा ज्ञानप्राप्तीचा प्रवास आहे. त्यातूनच मानवाला आपल्या कल्याणाचा मार्ग गवसला. असे प्रतिपादन अयोध्या येथील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संत गोविंददेव गिरी यांनी येथे केले. गोदाघाटावरिल देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत स्वामीजींनी आज ‘कथा तथागताची’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफले.
वसंत व्याख्यानमाला व रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे तीन दिवसीय व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, सह्याद्री फार्म या व्याख्यानमालेचे प्रायोजक आहेत. सुरुवातीला भाजपचे शहर अध्यक्ष सुनिल केदार यांच्यासह पाहुण्यांच्या हस्ते शाहीर गजाभाऊ बेणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वामीजींनी बुध्द वंदना सादर केली. तिमिराकडुन प्रकाशाकडे जाणारी मानवतेची व सर्वसामान्यांच्या सुखाची वाट शोधण्यासाठी भगवान बुध्द राजपाट आणि सर्वप्रकारचे ऐशोआराम सोडुन वनाकडे निघाले. त्यानंतरचा त्यांचा जीवन प्रवास संत गोविंददेव गिरी यांनी आजच्या कथा भागात विषद केला.

ते म्हणाले की, सर्वसामान्यांचे जीवन सूकर व्हावे यासाठी तथागतांनी हा मार्ग पत्करला. एखाद्या राजपूत्राने सारे काही अनुकुल असताना सर्व सुख सोयीचा त्याग करावा, हीच एक मोठी गोष्ट आहे. हा त्याग केवळ भावनेच्या भरात नाही, तर विचारपूर्वक केलेला त्याग आहे. त्याचबरोबर माझ्या मनात नसतानाही एका अदृष्य शक्तीने हे घडवून आणले आहे, ही सर्वोच्च भावना त्यांची होती. या घटनेनंतर घडलेला कल्लोळ, राज घराण्यातील सर्वांची घालमेल, त्यांच्या अंतःकरणातील भावना आदींचा उहापोह त्यांनी केला. त्यांना परत बोलावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, इतका त्यांचा विश्वास दृढ होता.
ते म्हणतात, या कौटुंबिक दुःखाचा आणि एकूणच मानव जातीला या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो आहे. म्हणजेच कोणत्याही भावनांचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला नाही. यातूनच त्यांचा त्याग व दृढनिश्चय आणि ज्ञानप्राप्तीची लालसा दिसून येते. याठिकाणी स्वामीजींनी भगवान बुध्द यांचे स्तवन गाऊन पुढील प्रवासाचे वर्णन करताना, जगाच्या दुःखाचे कारण अज्ञान असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गौतम बुध्द यांचा पहिला अनुभव, अनेक साधुंचे विस्मयकारक जीवनदर्शन, त्यांचे चिंतन, त्यांच्या साधना आणि या निरिक्षणातुन निर्माण होणारे प्रश्न आदींचे सुंदर विवेचन त्यांनी यावेळी केले.






