Letest Weather News: राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कडक ऊन असे वातावरण आहे. मागील हप्त्यात काही दिवस विदर्भ तापलेला होता, आता उष्णतेची लहर उत्तर महाराष्ट्रात आली आहे. जळगाव आणि मालेगावमध्ये तापमान वाढले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जळगावचा पारा ४१ ते ४२ अंश सेल्सियस पर्यंत होता. रविवारी तापमान ४२.५ अशांवर गेले आहे. हे राज्यात सार्वधिक कमाल तापमान ठरले होते, आज सोमवार पुन्हा तापमान ४४.५ अंश सेल्सियसवर गेले आहे. राज्यात सलग दोन दिवस जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत आहे.
राज्यभरात तापमान घसरले असतानाच जळगावमध्ये उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारी कडक उन्हाच्या झळा लागतात. रस्ते निर्मनुष्य होते. साहजिकच तापमान जवळपास ४५ अंशाच्या उंबरठ्यावर असल्याने जिल्हा चांगलाच तापला आहे. रात्री उशीरा पर्यंत हवेत उष्मा जाणवतो, मालेगाव ४२.२ तर नाशिक ही ४१ अंशावर पोहचले आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कडक ऊन लागत असल्याने गरज असेल तरच जळगावकरांनी बाहेर पडावे व आपली काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

दरम्यान कोकण- गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सार्वधिक कमाल तापमान जळगाव तर सर्वात कमी म्हणजे कमाल तापमान महाबळेश्वर येथे ३३.० इतके तापमान नोंदवले गेले आहे. कोकणात काही ठिकाणी हवामान कोरडे तर काही ठिकाणी वादळी पावसाने तांडव केल्याचे दिसले. खास करून रायगडमध्ये काही ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. एल-निनोमुळे भविष्यात हवामानातील बदलांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणाला हवामान विभागाने सलग दोन दिवस येलो अलर्ट दिला होता.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३४.६,
सांताक्रूझ ३५.४,
अलिबाग -,
रत्नागिरी ३५.६,
पणजी (गोवा) ३६.०,
डहाणू ३६.८,
पुणे ४१.४,
लोहगाव ४२.७,
अहिल्यानगर ४१.०,
जळगाव ४४.५,
कोल्हापूर ३८.६,
महाबळेश्वर ३३.०,
मालेगाव ४२.२,
नाशिक ४०.६,
सांगली ४०.०,
सातारा ३९.९,
सोलापूर ४१.६,
धाराशिव ३९.९,
छत्रपती संभाजीनगर ४२.४,
परभणी ४२.८,
नांदेड -,
बीड ४२.२,
अकोला ४३.४,
अमरावती ४२.८,
बुलढाणा ४१.६,
ब्रह्मपुरी ४०.८,
चंद्रपूर ४०.४,
गोंददया ३८.८,
नागपूर ४०.६,
वाशीम ३९.८,
वर्धा ४३.०,
यवतमाळ ३९.२.





