Muktainagar News: जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून जामनेर आणि पाचोरयेथे अपघाताच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यात गेल्याच आठवड्यात दोन अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, पुन्हा सोमवारी सकाळी आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातात दैव बलवत्तर म्हणून एक वर्षांचा चिमुरडा वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हिरामण पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील (दोन्ही रा. कोचूर, ता. रावेर), अशी मृत दांपत्याची नावे आहेत. पाटील दाम्पत्य देव दर्शनासाठी दुचाकीवरुन जात असताना बेलसवाडी (ता. मुक्ताईनगर) फाट्याजवळील मरिमाता माता मंदिरालगत सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास अपघात झाला, समोरुन भरधाव येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे पती-पत्नी जागीच ठार झाले. मात्र, त्यांचे एक वर्षाचे बाळ बचावले.
अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यकेले. या अपघाताच्या घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठण्यात आले होते. याप्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






