Chopda News: येथील विवेकानंद विद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल 99.28% लागला असून कु.स्वरा विनीत हरताळकर हिने 100% गुण मिळवून विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. स्वराने केवळ विद्यालयातच नव्हे, तर संपूर्ण चोपडा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.स्वराच्या या ऐतिहासिक यशासोबतच इतर विद्यार्थ्यांनीही दैदिप्यमान कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल दि. 8 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा देखील या निकालात मुलीच बाजीगर ठरल्या आहे. चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील कु. स्वरा विनीत हरताळकर 100% गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर सानवी अतुल पाटील: 97.80% द्वितीय, हर्षल भरत पाटील 97.60% व ऋतुजा किशोर पाटील 97.60% तृतीय तर सोहम हितेश जैन: 97% टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, याची प्रचिती चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाच्या निकालाने दिली आहे. नुकत्याच ऑनलाइन जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत (एसएससी) परीक्षेच्या निकालात कु. स्वरा विनीत हरताळकर हिने 100% गुण मिळवून विद्यालयाच्या इतिहासात गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे. विवेकानंद विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यार्थ्याने 100% गुणांचा टप्पा गाठल्याने संपूर्ण चोपडा शहरात आनंद व्यक्त करण्यात आला. आपल्या लाडक्या लेकीच्या या ऐतिहासिक यशाने पालकांचे मन अभिमानाने भरून आले आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाच्या दिशेने आज स्वराने पहिले पाऊल टाकले आहे. तिच्या कष्टाचे आज चीज झाले असून, तिने मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशी कृतज्ञतापूर्ण भावना विनीत हरताळकर व आजोबा डॉ. विकास हरताळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
गुणवत्तेची परंपरा कायम
विवेकानंद विद्यालयाचे 23 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पार आहे. स्वरा हरताळकर हिच्यासह शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाची परंपरा दिमाखात कायम ठेवली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 99.28% लागला असून, तब्बल 23 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून बाजी मारली आहे.
कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांची अहोरात्र मेहनत, पालकांचे व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा हा परिपाक आहे, असे गौरवोद्गार शाळेच्या वतीने काढण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.स्वराची ही यशोगाथा तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी येणार्या काळात नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर आणि सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पवन लाठी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, संजय सोनवणे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी. पाटील, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या भारती पंजाबी, गौरी शुक्ल, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती दीक्षित व योगिता केंगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






