होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

डिग्रीचा कागद आणि कष्ट करून मिळालेले अनुभव समान असतात: डॉ. मारुती पवार

On: May 7, 2026 12:34 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: तुटलेल्या वाटाच आपल्याला नवीन मार्ग दाखवत असतात. स्वप्नाना आपणच मर्यादा घालत असतो. परंतु पाय जमिनीवर असले तर आपल्याला कुठे पोहचायचे याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. गरज भासल्यास लाचार व्हावे लागते, परंतु काहीतरी करून दाखवण्याचे धाडस असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. डिग्रीचा कागद आणि हाताने केलेली मेहनत व मिळवलेला अनुभव हे समकक्ष असतात. असे प्रतिपादन नवी मुंबई येथील अँस्ट्रोनिक्स टेक्नो प्रा. लि. कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संस्थापक आणि स्टीलचे डॉक्टर अशी जगभर ओळख असलेले डॉ. मारुती पवार यांनी येथे केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत डॉ. पवार यांनी मंगळवारी स्वातंत्र्य सैनिक स्व. शांताराम पाटील (गडाख) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पाचवे पुष्प गुंफले. त्यावेळी ते ‘तुटलेल्या वाटांपासून अमर्याद स्वप्नांपर्यंत’ या विषयावर बोलत होते.
डॉ. जयवंतराव पाटील-गडाख, प्रायोजक आनंद अँग्रोचे प्रतिनिधी सदाशिवराव भदाने व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. शांताराम पाटील (गडाख) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. व्याख्यानमालेत आजपासून सुरू करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात सहभागी होण्याचा पहिला मान मिळालेले रामभाऊ डोंगरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. पवार यांनी यावेळी आपला अत्यंत प्रतीकुल परिस्थितीतून सुरू केलेला सायकल ते मर्सिडीज असा प्रवास कथन केला. ते म्हणाले की, वारकरी कुटुंब असल्याने चांगल्या संस्कारांचे बाळकडू मिळाले असले तरी प्रतिकूलतेमुळे खुप जिद्दीने यश मिळवावे लागले. पण हारलो तरी मैदान सोडायचे नाही हे एकच ध्येय ठेऊन चालत राहिलो. त्यामुळे मी माझी यशोगाथा सांगण्यापेक्षा इथवरचा खडतर प्रवास आपल्यासमोर मांडणार आहे. या प्रवासात अनेक कटु-गोड अनूभव घेतल्याचे सांगत त्यांनी अनेक हृदयस्पर्शी अनुभव मांडले. गरिबीशी झगडत असतानाच उराशी बाळगलेली स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास होता. यातून आजच्या तरुण पिढीला एवढेच सांगु इच्छितो की आई-वडिलांचे कष्ट कधीच विसरू नका. त्यांचा आदर, सेवा करा. मी इंजिनिअर व्हावे, अशी वडिलांची ईच्छा होती, तर डॉक्टर व्हावे असे आईला वाटत होते. मात्र परिस्थितीमुळे अनेकदा शिक्षणात अडथळे आले, पण वेळोवेळी मिळालेली मदत आणि करून दाखवण्याची जिद्द आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकते याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि त्यामूळेच आई आणि वडिलांचेही स्वप्न पूर्ण करू शकलो. आज स्टील म्हटलं की माझं किंवा आमच्या कंपनीचे नाव पुढे येतं, यातच माझं यश सामावले आहे. पण यासाठी मी जपलेली नाती, जोडलेली माणसं, कुटुंबीय, मित्र, नातेवाईक हेच महत्वाचे ठरले.

नाट्य-भाव-भक्तीचा संगम

व्याख्यानानंतर सागर कुलकर्णी प्रस्तुत ‘नाट्य-भाव-भक्ती’ हा हिंदी – मराठी भाव, भक्ती आणि नाट्य गितांच्या कार्यक्रमात रसिकांनी तल्लीन होऊन आस्वाद घेतला. यामध्ये सागर कुलकर्णी यांनी सादर केलेल्या गीतांना संगीत कुलकर्णी (तबला), पं. व्यंकटेश ढवण (पखवाज), शुभम इंगळे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. तर अभिजीत भाटजीरे व धनश्री सीमंत यांनी स्वरसाथ आणि राहुल हिंगे यांनी तालवाद्यावर साथ केली. उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment