Jalgaon News: जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्या विरुद्ध १२ संचालकांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा प्रस्ताव २७ एप्रिल रोजी दिला आहे. मात्र एक आठवडा उलटला असून या प्रकरणी कोणत्याच हालचाली दिसून आल्या नाही. दरम्यान आठ महिन्यांपूर्वी शामकांत सोनवणे यांना सभापती पदावरून खाली खेचणारे महाजन आता स्वतःच त्याच राजकीय पेचात अडकले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांना अविश्वासाची नामुष्की टाळण्यासाठी राजीनामा देण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे.
अविश्वास ठरावाबाबत चर्चेला उधाण आले असताना या सर्व घडामोडींवर सभापती सुनील महाजन यांनी प्रतिक्रिया देताना स्प्ष्टन केले की, मला अद्याप अविश्वासाची कोणतीही अधिकृत नोटीस मिळाली नाही, असे सांगितले. मात्र, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. बहुमत सिद्ध करण्याऐवजी आता त्यांना नामुष्की टाळण्यासाठी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांची माहिती आहे. विशेषतः अशा राजकीय पेच प्रसंगानंतर संचालक सहलीला रवाना होतात, या ठिकाणी काही वेगळेच वातावरण आहे. महाजन यांच्यावर अविश्वास आणणारे सर्व १२ संचालक अद्याप शहरातच ठाण मांडून आहे. ते सर्व संचालक महाजन यांच्या राजीनाम्याची वाट बघत आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतःला वेगळे ठेवल्याचे दिसून येत आहे.
अद्याप तरी राजकीय सहभाग नसल्याचे सध्या दिसत आहे. दरम्यान याबाबत उपनिबंधकांकडून यावर काही ठोस कार्यवाही होण्याची अपेक्षा होती. यथे ही काहीच हालचाली दिसत नाही, अद्याप महाजन यांना नोटीस देखील मिळाली नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. महाजन यांनी ही तसे नोटीस न मिळाल्याचा दावा केला होता. पुढील काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.






