Jalgaon News: जिल्ह्यातीळ काँग्रेसच्या अनेक घटना घडामोडीचे साक्षीदार असलेली वास्तू आहे. सुमारे ७३ वर्ष जुन्या काँग्रेस भवनाच्या या ऐतिहासिक वास्तूच्या जागी अत्याधुनिक तीन ते चार मजली नवीन इमारत उभारण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यास महाराष्ट्रातील ‘पथदर्शी’ प्रकल्प म्हणून वरिष्ठ पातळीवरून तात्काळ मान्यता देण्या आली आहे अशी, माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतीचे भूमिपूजन खासदार राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते होणार आहे, असे पवार यानी सांगितले.
ही ऐतिहासिक राजकीय वास्तू असलेले काँग्रेस भवन हे केवळ पक्षाचे कार्यालय नसून जिल्ह्याच्या राजकीय घटना घडामोडींचे केंद्रस्थान राहिले आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी याठिकाणी भेट दिली होती. तसेच काँग्रेस पक्षातील अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय दिग्गज नेत्यांच्या बैठका, राजकीय रणनीती आणि ऐतिहासिक निर्णयांचे साक्षीदार म्हणून या भवनाकडे पाहिले जाते. अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आठवणी या वास्तूशी जोडलेल्या गेलेल्या आहेत. काळानुरूप या इमारतीची अवस्था वाईट असून जीर्ण झालेले काही भाग कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

अशी असेल नवी इमारत
इमारतीची वास्तूरचना तयार असून वरिष्ठ पातळीवरून तिला मंजुरी मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेकडे अंतिम आराखडा मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. सुमारे १० हजार चौरस फुट जागेत भवन उभारले जाणार आहे. नव्या इमारतीत पक्षाच्या प्रशासकीय कार्यालयांसह बैठकींसाठी आधुनिक सभागृह, कार्यकर्त्यांसाठी सुविधा, प्रशिक्षण केंद्र तसेच डिजिटल कार्यालय व्यवस्था केली जाणार आहे. पक्षाच्या निधीतून ही नवीन इमारत उभारण्यात येणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरेल, या दृष्टीने ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. जळगाव काँग्रेस भवनाच्या नव्या उभारणीमुळे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
रावेर शहरात काँग्रेसकडे सुमारे ६० हजार चौरस फुट जागा असून, चाळीसगाव शहरात १८०० ते १९०० चौरस फुट जागा आहे. अमळनेर येथे २३०० चौरस फुट जागा असून, एरंडोलमध्येही पक्षाची मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. या मालमत्तांचा भविष्यात संघटनात्मक आणि विकासात्मक कामांसाठी उपयोग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






