होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जे समाजात नाही, ते आणणे हाच समाजसेवेमागचा मूळ विचार- अरूण जोशी

On: May 14, 2026 12:33 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: आजोबा आणि वडिलांनी राबवलेले विविध उपक्रम आणि समाजकार्य हे माझ्यासाठी जणू बाळकडूच ठरले. प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे हे कार्यच माझ्यासाठी प्रेरणा ठरले. जे समाजात नाही, ते आणणे हा त्यामागचा प्रमुख विचार असतो, असे प्रतिपादन पुण्याच्या मायदेश फाऊंडेशनचे संस्थापक अरुण जोशी यांनी येथे केले.

वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याखानात ‘समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा’ या विषयावर विचार मांडताना ते बोलत होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. निर्मलाताई दातार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष संगीता बाफणा व उपाध्यक्ष उषा तांबे यांनी स्वागत केले.

दरम्यान, चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने आज रसिकांना नाशिकमधील सर्वात जुन्या कमला-विजय हॉटेलचे संचालक मधुकर जाधव यांच्या चित्रकृती बघावयास मिळाल्या. त्यांचाही यावेळी सत्कार झाला. जोशी म्हणाले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने काम सुरू केल्यानंतर या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्थांच्या नानाविध उपक्रमांनी मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. त्यातही आजोबा आणि वडील व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था ह्या रूढ अर्थाने माझे प्रेरणास्थान आहेत, असे सांगत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची पार्श्वभूमी विशद केली.

यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील आजोबांचे कार्यही प्रेरणादायी ठरल्याचे ते म्हणाले. विशेषतः व्यापार, व्यवसायाच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या मराठी लोकांसाठी त्यांनी त्या काळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेची स्थापना केली. पुढे वडिलांनी मात्र प्रामुख्याने त्यांच्याकडून सामाजिक कार्याचाच वारसा स्वीकारला. त्यामुळे ते माझ्यासाठी समाजसेवेचे दीपस्तंभ ठरले. गोळवलकर गुरुजींचे निकटवर्तीय असल्याने आमच्याकडे सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांचा राबता होता. पुढे 1964 मध्ये त्यांनी स्वतःची संस्था स्थापन केली. प्रामुख्याने रक्तदानावर त्यांच्या संस्थेचा अधिक भर होता. याशिवाय त्यांनी सुरू केलेले ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे उपक्रम, त्यांचे वाढदिवस, सामुदायिक प्रार्थना आदी उपक्रम आजही सुरू आहेत.

या संपुर्ण समाजकार्यातूनच प्रेरणा घेऊन मी देखील असे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आजही राबवत आहे. अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. शास्त्रीय संगीताची आवड जोपासतानाच पुर्वाश्रमीच्या जोशी फाऊंडेशनचे नाव बदलून मायदेशी फाऊंडेशन नावाने विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विले पार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि रत्नागिरी येथील 200 वर्षांची परंपरा असलेल्या वाचनालयाची पुनर्बांधणी केली असून, आता भगूर येथील स्वा. सावरकर स्मारकाच्या विकासाचा प्रकल्प आम्ही हाती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

हिट्स ऑफ मेलोडिजने जागवल्या आठवणी

व्याखानानंतर रसिक प्रेक्षकांनी जयंत चांदवडकर प्रस्तुत हिट्स ऑफ मेलोडिज या लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. आठवणीतील हृदयस्पर्शी जुन्या गाण्यांद्वारे रसिकांनी मनःपूर्वक दाद दिली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment