Amalner News: जळगावचा पारा हा ४१ अंशांपर्यंत पोचला आहे, वातावरणात सध्या कमालीचा उष्मा आहे, आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये ही उन्हाचे चटके बसत आहेत. त्यातच वाढत्या उष्म्यामुळे एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी रघुनाथ वाल्हे या तरुण मजुराचा मंगळवारी दुपारी शेतात मशीनवर बाजरी काढत असताना उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. यापूर्वी पाचोरा येथे एका महिलेचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.

रघुनाथ वाल्हे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. हाताला मिळेल ते काम करून ते मजुरी करत होते. सद्या धान्य काढणीच्या मशीनवर ते काम करत होते. मंगळवारी दुपारी देविदास पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ते बाजरी काढत होते. अचानक त्रास झाल्याने त्यांचा उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार आहे.घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जळगावचा पारा ४०. ४ अंशावर घसरला आहे. मंगळवारी काल ४०.९ इतका होता, बुधवारी पारा आणखी घसरला आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा असला दुपारी आणि सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता. एप्रिलच्या शेवटला आणि मे सुरुवातीला जळगावचे तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सियस पर्यंत पोहचले होते. त्यामुळे वातावरणात उष्मा निर्माण होऊन रस्ते निर्मनुष्य झाले होते. दुपारी १२ ते ४ या दरम्यान न फिरण्याचे आवाहन शासनाने केलं होते. तसेच उष्मघात कक्ष ही स्थापण्यात आला आहे. उन्हात काम करतांना अथवा फिरतांना स्वतःची काळजी घ्यावी.






