Nashik News: आपले विचार हे केवळ आपल्या व्यक्तिमत्वावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर प्रभाव टाकत असतात. अशा पार्श्वभूमीवर आगामी कुंभमेळा काळात कोट्यवधी दुःखी आत्मा आपल्या नगरीत येणार आहेत. ते सगळे येथुन संतुष्ट, समाधानी होऊन परतले पाहिजे. असा संकल्प आज आपण करूया, जेणेकरून आपण जगाला स्वच्छतेचा, स्वास्थ्याचा, शांती आणि सेवाभावाचा संदेश देऊ या. असे प्रतिपादन जागतिक किर्तिच्या समुपदेशक, मार्गदर्शिका व प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रमुख शिवानी दीदी यांनी येथे केले.
गोदाघाटावरिल देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत रविवारी (दि. 3) दिदींचे विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ‘अनिश्चित समय में आंतरिक शक्ति’ या विषयावर दीदींनी सुंदर निरूपण केले. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी माऊंट आबु येथुन आलेल्या खास पथकाने आध्यात्मिक गाणी व नृत्य सादर केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरीय विश्वविद्यालयाच्या नाशिक केंद्राच्या प्रमुख वासंती दीदी यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. ज्ञानपीठ मंडळाचे महाव्यवस्थापक राजेंद्रनाथ तिवारी, रश्मिताई देशमुख, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, महापौर हिमगौरी आहेर-आडके, भन्ते राहूल बोधी, बाळासाहेब सोनवणे, शेखरभाई शाह, दोंडाइचा येथील नगराध्यक्ष जितेंद्रकुमार रावल यांच्यासह पाहुण्यांच्या हस्ते अशोकराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवानी दीदी यांचा सत्कार करण्यात आला.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. शिवानी दिदींच्या पावन उपस्थितीमुळे जणु गोदाकाठी ज्ञानाचा कुंभमेळा आपण अनुभवत असल्याचे त्यांनी नमुद केले. त्यानंतर दीदींच्या हस्ते अमृतकुंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल यांनी मंत्रपठण केले. सध्या विविध कारणांनी जगभरात असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात मानवाची आंतरिक शक्तीच कशी तारणहार ठरू शकते याबाबत सोदाहरण निरूपण करताना दीदींनी आपल्या अमोघ वाणीतून श्रोत्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले. त्या म्हणाल्या की, मैं प्रेमस्वरूप आत्मा हूँ, हा भाव आपली आंतरिक शक्ती वाढविण्यास मदत करेल. येत्या वर्षभरात संपुर्ण जगातून येथे येणाऱ्या प्रत्येक आत्म्यासाठी माझे काय योगदान असेल याचे चिंतन करून त्याप्रमाणे संकल्प करू या. या संदर्भात त्यांनी चिमणी आणि जंगलाला लागलेली आग ही बोधकथा सांगून मार्गदर्शन केले.
त्या पुढे म्हणाल्या, येथे येणाऱ्या प्रत्येकाला येथील वायुमंडळात परिवर्तन झालेला दिसला पाहिजे. विशेष म्हणजे यातून सर्वप्रथम आपल्यालाच लाभ होणार आहे. त्यातुन मजबूत होणारी आपली आंतरिक शक्तीच मानवजातीला आजच्या अनिश्चित वातावरणातून बाहेर काढु शकणार आहे. याच अनुषंगाने त्यांनी स्वस्तिकच्या माध्यमातून चारही युगांचे वर्णन करत कलीयुगापासुन पुन्हा सत्ययुगाकडे जाण्याची ही संधी असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला केवळ हा संदेश द्यायचा नसून, प्रत्यक्ष रोलमॉडेल दाखवायचे आहे. त्यासाठी आपल्याला केवळ स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे. पूर्वी प्रत्येक घरात एकजण पैसे कमावणारा असे. आज त्या ऐवजी प्रत्येक घरात एकजण शक्ती कमावणारा असावा, ही काळाची गरज आहे. असा शक्तीस्तंभ बनण्याची शक्ती प्रत्येक आत्म्याकडे आहे. त्या शक्तीचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे.






