होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आशियातील सर्वात महत्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर’ महाराष्ट्रात: फडणवीस

On: May 11, 2026 7:41 PM
Follow Us:
---Advertisement---

New Delhi: भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठीची क्षमता एआय, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक वाहने , प्रगत उत्पादने, स्वच्छ ऊर्जा, डेटा सेंटर्स, जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स ) आणि ‘डीप-टेक’ कल्पकतेवर आधारित असेल. या निकषावर महाराष्ट्र स्वतःला या बदलाच्या केंद्रस्थानी स्थापित करत आहे. आज महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठ्या जीसीसी केंद्रांपैकी २४ टक्के केंद्रे आहेत. राज्य आशियातील सर्वात महत्त्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर’ म्हणून उदयास येत आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. इथले ऑटोमोटिव्ह क्षेत्र आता ‘नेक्स्ट-जनरेशन मोबिलिटी’ मध्ये रूपांतरित होत आहे. देशातील २० टक्के ऑटोमोबाईल उत्पादने आणि ईव्ही उत्पादनात आम्ही आघाडीवर आहोत, असेही मुख्यमंत्री येथे म्हणाले.

नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट – २०२६ या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत सकाळच्या सत्रात झालेल्या व्हिजन फॉर इंडिया@१०० परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. (सीआयआय)

भविष्यातील अर्थव्यवस्था ही महामार्ग, बंदरे, विमानतळ, डिजिटल नेटवर्क्स, संशोधन प्रयोगशाळा, स्टार्टअप इकोसिस्टम आणि विद्यापीठांवर उभी असेल आणि म्हणूनच महाराष्ट्रात अभूतपूर्व वेगाने गुंतवणूक होत असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, मेट्रोचे जाळे, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक इकोसिस्टम, डिजिटल पायाभूत सुविधा आदी प्रकल्प एकत्रितपणे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल बदलवत आहेत आणि जेव्हा भूगोल बदलतो, तेव्हा अर्थव्यवस्था बदलते. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. (सीआयआय)

इतिहासात असे काही क्षण येतात जेव्हा देश बदलामध्ये सहभागी होतात आणि असेही काही क्षण येतात जेव्हा देश त्या बदलाची व्याख्या स्वतः ठरवतात. सध्याचा क्षण हा भारतासाठी बदलाची व्याख्या ठरवण्याचा आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचे जग एकाच वेळी अनेक स्थित्यंतरातून जात आहे—यात भू-राजकीय विखंडन, तांत्रिक उलथापालथ, ऊर्जा संक्रमण, पुरवठा साखळीतील बदल आणि आर्थिक विकासाच्या भविष्याबद्दलची मोठी अनिश्चितता यांचा समावेश आहे.मात्र, या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव देश मोठ्या प्रमाणावर जगाचा आत्मविश्वास वाढवत आहे. त्याचे कारण केवळ आमची बाजारपेठ अथवा तरुण लोकसंख्या नाही तर आमच्याकडे स्थैर्य, महत्त्वाकांक्षा, लवचिकता आणि अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने गेल्या दशकात स्वतःबद्दल जागतिक स्तरावर नवी प्रतिमा स्थापित केली आहे. आता आमच्याकडे क्षमतेसोबतच संधी आणि धोरणांची वेगाने अंमलबजावणी करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. (सीआयआय)

महाराष्ट्र देशाची ‘डेटा सेंटर’ आणि ‘स्टार्टअप’ राजधानी

प्रधानमंत्री यांच्या द्रष्ट्या धोरणांची अंमलबजावणी राज्यांनाच करावी लागेल, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. त्यातही आमचा प्रयत्न पूर्णतः कायापालट करण्याचा आहे. दशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे ‘इकोनॉमिक इंजिन’ राहिले आहे. पण आता आम्ही त्याहूनही मोठ्या ध्येयासाठी स्वतःला तयार करत आहोत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोत. आज महाराष्ट्र ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे, जी भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १५ टक्के योगदान देते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा २० टक्क्यांहून अधिक असून देशाची ‘डेटा सेंटर’ आणि ‘स्टार्टअप’ राजधानी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अभिमानपूर्वक नमूद केले. (सीआयआय)

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता

भविष्यातील महाराष्ट्राबाबत आमचा रोडमॅप स्पष्ट असून २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांपैकी एक असणे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राने जवळपास ३० लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आणले. आजचे गुंतवणूकदार सवलतींसोबतच शाश्वत विश्वासाच्या शोधात आहेत. दीर्घकालीन विचार, जलद निर्णय आणि विश्वासार्हतेने अंमलबजावणी या त्रिसुत्रीची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारांच्या शोधात गुंतवणूकदार आहेत. अनिश्चिततेच्या जगात, विश्वास हीच खरी आर्थिक पुंजी असते आणि महाराष्ट्राने हा विश्वास निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. या सर्व शक्तींचा सहयोग साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्याचे नेतृत्व करणार असल्याने ही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवेने प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (सीआयआय)

गडचिरोली २०३२ पर्यंत भारताचे सर्वात मोठे ‘ग्रीन स्टील’ उत्पादक जिल्हा बनेल

जागतिक ऊर्जा संक्रमण ही आपल्या काळातील सर्वात मोठी आर्थिक संधी निर्माण करत आहे.विश्वासार्ह हरित ऊर्जा, शाश्वत पायाभूत सुविधा, लवचिक पुरवठा साखळी आणि पर्यावरणपूरक व्यवस्था मिळेल अशाच ठिकाणांची भविष्यातील उद्योग निवड करतील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र हा बदल ओळखून अक्षय ऊर्जा, ईव्ही इकोसिस्टम, ग्रीन मोबिलिटी आणि शाश्वत औद्योगिक पायाभूत सुविधांचा आक्रमकपणे विस्तार करत आहे.आमच्यासाठी शाश्वतता हा केवळ नियम पालनाचा विषय नाही, तर ते आमचे स्पर्धात्मक धोरण आहे. आजचे तरुण उद्योजक आणि व्यावसायिक केवळ पगाराचा विचार करत नाहीत, तर ते अनुकूल वातावरणाची निवड करतात. त्यांच्या अपेक्षांचा विचार करून महाराष्ट्राचा शहरी कायापालट हा आमच्या आर्थिक दृष्टीकोनाचा केंद्रबिंदू आहे. मुंबई जागतिक आर्थिक आणि नाविन्यपूर्ण राजधानी म्हणून विकसित होत राहील. पुणे उत्पादन, तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र म्हणून आपली पकड मजबूत करेल. नागपूर हे भारताचे लॉजिस्टिक आणि भौगोलिक-धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे आमचे नवीन युगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असतील. गडचिरोली हे २०३२ पर्यंत भारताचे सर्वात मोठे ‘ग्रीन स्टील’ उत्पादक जिल्हा बनेल. आणि आमची द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे औद्योगिक विकासाची पुढची इंजिने ठरतील.संतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. (सीआयआय)

‘सीआयआय’ संस्थांची भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका

महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद म्हणजे इथला खुलेपणा, उद्योजकता, प्रागतिक विचारांचे नागरिक, भांडवल आणि कल्पकता आत्मसात करण्याची क्षमता असल्याचे अभिमानाने नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र उद्योगांकडे राष्ट्रनिर्मितीतील भागीदार म्हणून मोठ्या आशेने पाहतो. केवळ सरकार जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अर्थव्यवस्था निर्माण करू शकत नाही आणि केवळ उद्योगही ते करू शकत नाहीत. भावी काळ हा जिथे सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधक एका सामायिक ध्येयाने एकत्र काम करतील, अशा समाजाचा असणार आहे आणि ‘सीआयआय’ सारख्या संस्थांची हे भविष्य घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका राहणार आहे.जेव्हा भारत २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांनी आजच्या वर्तमानाचा परिवर्तनाचा कालखंड म्हणून कृतज्ञ उल्लेख केला पाहिजे, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात काढले.

सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यांनी आपल्या प्रास्ताविकात मुखमंत्र्याच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव केला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment