Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक नगरीत येणा-या लाखो भाविकांना आणि स्थानिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर सक्रिय झाले आहे. वीज विषयक कामांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी संचालक सचिन तालेवार यांनी नुकतीच नाशिक रोडच्या ‘विद्युत भवन’ येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणेचे सूक्ष्म नियोजन करण्याचे तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे व पंकज तगलपल्लेवार (मुंबई) यांची मुख्य उपस्थिती होती. तालेवार यांनी स्पष्ट केले की, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यात वीज सेवा सुरक्षित आणि दर्जेदार ठेवणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता राहील. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करून सर्व विभागांमध्ये योग्य ताळमेळ आणि समन्वय राखणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यास तो त्वरित पूर्ववत करण्यासाठी सक्षम पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्व उपकरणांची नियमित देखभाल व दुरूस्ती ठेवावी.
तालेवार म्हणाले की, वीज यंत्रणेची विविध कामे तसेच पायाभूत सुविधांची उभारणी करताना गुणवत्ता व दर्जाशी तडजोड केली जाणार नाही. सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करतानाच कामाच्या ठिकाणी सुरक्षा मानकांचे १०० टक्के पालन होईल याची खात्री अधिका-यांनी करावी. विद्युत यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने गोदापार्क, भद्रकाली, नांदूर – मानूर आणि तळवाडे येथे नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
बैठक संपल्यानंतर सचिन तालेवार यांनी नाशिक शहराचा दौरा करून कुंभमेळ्याच्या दृष्टीने उभारल्या जाणा-या महत्त्वाच्या विद्युत उपकेंद्रांच्या व यंत्रणेच्या कामांची पाहणी केली. तांत्रिक मार्गदर्शन केले. वीज विषयक कामांचा वेग आणखी वाढवण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर व राजेश थुल, कार्यकारी अभियंते चेतन वाडे, शितलकुमार घुमे, नितीन पगारे आणि विद्युत कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.






