होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

रा. स्व. संघाचा प्रवास म्हणजे राष्ट्र साधनेची शतकी साधना- प्रफुल्ल केतकर

On: May 13, 2026 8:25 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर इथली प्रत्येक व्यक्ती राष्ट्रप्रेमी असली पाहिजे. यासारख्या विचारांतून संघाची स्थापना झाली आहे. त्यामुळे संघाच्या शतकी वाटचालीचे वर्णन फक्त ‘राष्ट्र साधनेचे शतक’ असेच करावे लागेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील साप्ताहिक ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी येथे केले.

नाशिकची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत सोमवारी ते स्व. बाबुराव हाके स्मृती व्याखानात ‘रा. स्व. संघ : राष्ट्र साधनेचे शतक’ या विषयावर बोलत होते. विश्व हिंदु परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजेश दरगोडे, रा. स्व. संघाचे शहर कार्यवाह सुहास वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. बाबुराव हाके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. व्याख्यानमालेच्या निमित्ताने यंदा नाशिकच्या वेगवेगळ्या चित्रकारांनी रेखाटलेल्या विविध शैलीतील चित्रांचे प्रदर्शन रोज भरविले जात आहे. या शृंखलेत आज ज्येष्ठ चित्रकार विजयकुमार थोरात यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. कला प्रांतातील सर्वच प्रकारांना उत्स्फुर्त दाद देणाऱ्या रसिक नाशिककरांनी या प्रदर्शनाचाही लाभ घेत. थोरात यांच्या कलेचे मनमुराद कौतुक केले. त्यांचाही यावेळी सत्कार झाला.

केतकर यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा धावता आढावा घेताना संघाची धोरणं, विचार आणि निष्ठेचीही विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून राष्ट्रचेतनेची प्रेरणा घेऊन डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. या पार्श्वभूमीमुळे संघाने मागील शंभर वर्षे राष्ट्र चेतना आणि राष्ट्र निर्मितीचा ध्यास घेतला आहे. या संपुर्ण प्रवासात अगदी सुरुवातीपासूनच मुलभूत समस्यांचा संघाने अभ्यास केला आहे. त्यातून ठोस निष्कर्ष काढले. संपुर्ण समाजाचं संघटन असा मुळ विचार त्यामागे असल्याने डॉ. हेडगेवार आणि एकुणच संघाने कुणालाही आपले शत्रु मानले नाही, असे सांगत त्यांनी या प्रवासाचे चार टप्प्यांत विभागणी करून हा संपुर्ण पट उपस्थितांसमोर मांडला.

यामध्ये पहिला टप्पा हा उपहासाचा होता. याच टप्प्यात संघ एक कार्यपद्धती म्हणुन विकसित झाला. दुसरा टप्पा हा हेटाळणी आणि द्वेषाचा होता. स्वातंत्र्य ते आणीबाणीपर्यंतचा हा काळ होता. या काळात सत्याग्रह झाले, आंदोलनं झाले, अखिल भारतीय विद्यार्थी संघ आणि जनसंघासारखे पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय मजदूर संघ यासारख्या संघटना स्थापन झाल्या. त्यामुळेच हा संघर्षाचा काळ होता. त्यातुन निघालेल्या संघाने तिसऱ्या टप्प्यात समाज जागृतीसाठी संघटन अशी संकल्पना घेऊन संघ घराघरात पोहचला. या काळात प्रचंड मोठे काम स्वयंसेवक संघाने उभे केले आहे. तेथूनच संघ विचारांची पेरणी झाली. याच काळात संघाने सेवा कार्य सुरू केले. यातुन प्रेरणा घेऊन राष्ट्र चेतनेचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यानंतरचा चौथा टप्पा म्हणजे आजच्या काळापर्यंतचा ताजा इतिहास आहे. याच टप्प्यात संघ प्रथमच रस्त्यावर उतरला. असा हा प्रवास नेहमीच राष्ट्राच्या पुनःस्थापनेच्या दृष्टीने आजही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रशक्तिची शांततामय अनुभूती

दरम्यान, दुसऱ्या सत्रात आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत ‘मंत्र संध्या’ हा विशेष कार्यक्रम झाला. वीरेश चापटे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांनी मनःशांतीसाठी मंत्र साधनेची शक्ती अनुभवली. आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण वातावरणात मनःशांती आणि आत्म समाधानासाठी अध्यात्म, ध्यान, भक्ती, सेवा असे अनेक मार्ग उपलब्ध असले, तरी य सर्वच मार्गात मंत्रशक्ती ही नेहमीच उपयुक्त आहे. मात्र त्याची शास्त्रीय पद्धती आपल्याला ठाऊक नसते. अशावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या संस्था सर्वतोपरी सहकार्य करू शकतात. साधनेचा हा मार्ग चोखाळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आत्मिक शांतीच्या प्राप्तीसाठी मंत्रशक्ती नेहमीच उपयुक्त असल्याची अनुभूती या कार्यक्रमातून आली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment