Amlner News: खान्देश शिक्षण मंडळावार धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंडळाच्या कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय तसेच आर्थिक व्यवहार करू नयेत, असे स्पष्ट निर्देश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. या संदर्भातील सूचना शिक्षण विभागालाही देण्यात आल्या आहेत. सन २०२५–२८ या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी धर्मदाय आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, माजी संचालक दिलीप जैन यांनी या निवडणुकीवर हरकत घेत ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.
यापुर्वी धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली निवडणूक घेण्याचे आदेश असतानाही तत्कालीन कार्यकारिणीने उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली होती. दरम्यान, ही बाब न्यायालयात प्रलंबित असतानाच धर्मदाय आयुक्त व त्यांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत निवडणूक घेऊन निकाल जाहीर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, सादर करण्यात आलेल्या चेंज रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “चेंज रिपोर्ट का मंजूर करू नये?” याबाबत मंडळाचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी व चिटणीस/प्राचार्य यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, अंतिम निर्णय होईपर्यंत मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय किंवा आर्थिक व्यवहार धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय करू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची प्रत अद्याप संस्थेला मिळालेले नाही, प्रत मिळाल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेरचे चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी सांगितले.






