Nashik News: राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले. ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवीत उत्साहाने जलजागृतीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला माजी मंत्री रवींद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, मंत्री विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, ह.भ.प.संजय नाना धोंगडे, महंत उद्धव महाराज मंडलिक, मंदाकिनी मोरे, महामंडलेश्वर रामचंद्रदास मोरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.
‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या’ अंतर्गत आयोजित या जलयात्रेचा मुख्य उद्देश राज्यातील जलस्त्रोतांबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा आहे. ही जलयात्रा २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी आणि तरुण सहभागी झाले आहेत.
त्र्यंबकेश्वर शहरातून प्रारंभ झालेल्या या जलदिंडीचा श्री स्वामी समर्थ गुरूपीठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत (पालखेड), लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश पाटील, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, आचार्य तुषार भोसले यांच्यासह नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि नागरिक, महिला मोठ्या संख्येने या जलदिडींत सहभागी झाल्या.
जल यात्रेचा प्रवास असा असणार आहे
२५ एप्रिल : त्र्यंबकेश्वर ते संगमनेर (मुक्काम : संगमनेर).
२६ एप्रिल : संगमनेरमार्गे शिर्डी (मुक्काम : शिर्डी).
२७ एप्रिल : कोपरगाव, वैजापूर, संभाजीनगर, घृष्णेश्वर (मुक्काम : घृष्णेश्वर).
२८ एप्रिल : कन्नड, चाळीसगाव, धुळे (मुक्काम : धुळे).
२९ एप्रिल : धुळे ते महेश्वर, मध्य प्रदेश (समारोप).






