Dharangaon News: लग्नाचा आनंद ओसरायच्या आतच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी लग्न झालेली नववधू ही कुटुंबासमवेत माहेरी परतत असतांना नववधूसह तिघांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी घडली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहिती अशी की, अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच वधू पूजा ही आपल्या नातेवाईकांसोबत माहेरी अकोल्याकडे परतत होती. संबंधित सर्व कुटुंब हे क्रूझर (एमएच ३० एझेड ४७१०) या वाहनाने प्रवास करत होते. या दरम्यान, वराड गावाजवळ सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास गाडीचे एक चाक अचानक निखळले. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, पूजा वागडकर या नववधूसह दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे काही दिवसांपूर्वीच लग्नसोहळ्याने गजबजलेल्या वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या अपघातात प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि अंश नितेश काठोडे (वय १४) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू केला आहे.
अपघाताचे नेमके कारण
चालत्या वाहनाचे चाक निखळल्याने नियंत्रण सुटले, वाहनाचा वेग अधिक असल्याने अपघाताची तीव्रता वाढली असून सुरक्षा तपासणीचा अभाव असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताच्या घटनेनंतर नागरिक, स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले, आणि जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत करून पोलिस व आपत्कालीन यंत्रणांना माहिती दिली






