Jalgaon Crime News: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑल आऊट’ विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. ३६ पोलीस ठाणे व ३ वाहतूक शाखांनी संयुक्तपणे नाकाबंदी करून अवैध धंदे, गुन्हेगार व समाजकंटकांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत २५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४,१८,६२९ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच १९५ आरोपींवर कारवाई करत १०१ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व संदीप गावीत यांच्या देखरेखीत २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वय साधत एकाचवेळी विविध ठिकाणी नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविली.दरम्यान अवैध दारूविरोधात मोठी कारवाई करत १३६ प्रकरणे नोंदवून तब्बल २५,१३,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार कायद्यान्वये ५७ प्रकरणांत ५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १५ प्रकरणे दाखल करण्यात आली, असून अवैध व्यवसायांवर आळा घालण्यात आला. वाहतूक नियमभंगाविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत २७२ प्रकरणांत २,८२,३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर फॅन्सी नंबर प्लेट व बुलेट सायलेन्सरविरोधात १५० कारवाया करून १,०४,१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक (COTPA) कायद्यान्वये २३३ प्रकरणांत ३२,२२९ रुपयांचा दंड आकारण्यात आला.
याशिवाय ‘मुस्कान’ मोहिमेद्वारे ३४ हरविलेले बालक व महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तसेच आर्म अॅक्ट अंतर्गत कारवाई करत तलवार व धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. जिल्हा पोलिसांच्या या व्यापक आणि समन्वित कारवाईमुळे गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.






