Nashik News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, विविध ३०० हून अधिक उद्योजकांसोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. ३१ हजार कोटीची गुंतवणूक झाली असून त्यातून ६६ हजार इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. क्षमता आणि सुविधांद्वारे येथील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हॉटेल ताज येथे आयोजित ‘कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषद २०२६’ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आहेर- आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ३०० हून अधिक उद्योजकांसोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून ३२ हजार इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.

नाशिक हे विकासाची मोठी संधी असलेले शहर असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात गुंतवणूक व्हावी यासाठीचा कुंभ उद्योग संगम उपक्रम अतिशय चांगला आहे. या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून नाशिक विकासाच्या मुख्य धारेत पुन्हा आला आहे. मागील तीन वर्षांपासून आपण जिल्हा केंद्रित गुंतवणूक परिषद घेण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण ३१ हजार ९४५ कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात झाली आहे. त्यातून ६६ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामंजस्य करारापैकी ७७ टक्के कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी आधारित सेवा, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, सेवा क्षेत्रासह इतर उद्योगातील गुंतवणुकीचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
नाशिकमध्ये दोन वर्षात ५७ हजार कोटींची गुंतवणूक
नाशिक जिल्ह्यातही अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करत आहे, जागा उपलब्ध झाल्यास या उद्योगाची त्वरित सुरूवात करण्यात येईल. याशिवाय, रिलायन्स, लार्सन ॲण्ड ट्युब्रो यासारख्या उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. अनेक उद्योगसमूह येथे उद्योगविस्तारासाठी इच्छुक असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिकसाठी आली असून दावोस येथे झालेल्या परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी १२ हजार कोटींची गुंतवणूक राज्य शासनाने आणल्याचे त्यांनी नमूद केले.






