Solapur News: बहूप्रतिक्षीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकासाच्या आराखड्यास आज मंत्रिमंडळ शिखर समितीच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार समाधान आवताडे तसेच जलसंपदा आणि महसूल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एक ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
सर्व भक्तांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशासह जगभरातून भाविक येत असतात. वारकरी आणि माउलीचे अढळस्थान असलेले पंढरपूरला मोठ्या प्रमाणात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांची गर्दी होते. भक्तांचा हा मेळा तसा वेगवेगळ्या दिवशी लागतच असतो, मात्र एकादशीला मात्र भक्तांचा महापूर या ठिकाणी लोटतो. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या सोयीसुविधा करतांना बराच ताण पडतो. चहू बाजूने येणारी गर्दी नियंत्रित करणे मोठे जिकरीचे काम असते. गेल्या आषाढी एकादशीला तब्बल २७ ते २८ लाख भाविक पंढरपूरला आल्याची नोंदणी आहे. या अनुषंगाने पंढरपूर मंदिर परिसराचा विकास आणि विस्तार करण्याच्या दृष्टीने नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसरात दुर्घटना घडू नये, सुरक्षितता असावी यावर लक्ष देऊन भाविकांना विठ्ठलाचे सहज दर्शन घेता यावे यासाठी हा आराखडा बनवला जाणार आहे. तसेच हा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट’ देखील मानला जात आहे.
अशा प्रसिद्ध देवस्थान असलेल्या पंढरपूरचा विकास आराखडा आणि कॉरिडॉरसाठी साधारण ४ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिखर समितीने मंजुरी दिली. पंढरपूरला पुढील ५० वर्षात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, मंदिर परिसरात कॉरिडॉर आणि शहरात विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. साधारण ४ हजार कोटींचा रुपयांचा हा आराखडा असून याला आता मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे लवकर आता पंढरपुरात विकास कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच या विकास आराखड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती होती, आपला उद्योग व्यवसायावर गदा तर येणार नाही ना? अशी शंका उपस्थित झाली. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरला काही स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला होता, या ठिकाणी असलेली वर्षोनुवर्षे जुनी दुकाने स्थलांतर होणार असल्याने व्यापाऱ्यांनी त्याला विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर मधील झालेल्या एका सभेत व्यापाऱ्यांना भूमिका स्पस्ष्ट करून विश्वासात घेतेले आणि या कॉरिडॉरमुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट अधिक वाढेल, असे सांगून लवकरच विकास आराखडा मंजूर होणार असल्याचे स्पष्ट केले.











