Delhi News: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान याला पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये (PoK) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले असून त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गोळ्यांनी त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते, त्यात हा दहशतवादी जागीच ठार झाला. तो २०१७ मध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचा दावा करून पाकिस्तानला गेला होता, परंतु नंतर तो अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि लवकरच कमांडर बनला.
दि. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला. एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवली. या हल्ल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हा हल्ला देशातील सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. असे म्हटले जाते की, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो मैलो दूरपर्यंत ऐकू आला आणि रस्त्यावर एक खोल खड्डा पडला.
अशी झाली हत्या
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मुझफ्फराबादमधील एआयएसएस कॉलेजबाहेर हमजाची गाडी वाहतूक कोंडीत अडकली असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तो जागीच ठार झाला. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते आणि त्यांनी बुरखा घातला होता.
अल-बद्रमध्ये सामील झाल्यानंतर तो काश्मीरला परतला होता. त्याच्यावर दक्षिण काश्मीरमधील तरुणांना कट्टरपंथी बनवून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती केल्याचा आरोप होता. त्याचे नेटवर्क प्रामुख्याने दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय आहे. तसेच २०२२ मध्ये केंद्र सरकारने हमजा बुरहानला दहशतवादी जाहीर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आपली ओळख लपवण्यासाठी हमजा पाकिस्तानात एका शाळेचा प्रिन्सिपल म्हणून काम करत होता. त्याचे अनुयायी त्याला एक डॉक्टर नावाने ओळखत होते. काश्मीरमधील रहिवासादरम्यान, हमजाने आपले जाळे पुलवामापासून शोपियानपर्यंत वाढवले होते. त्याचा मृत्यू हा पाकिस्तानमधील दहशतवादी गटांना मोठा धक्का मानला जात आहे. तो जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांसाठी काम करणारा प्रमुख दहशतवादी होता. हमजा हा ठार झालेले दहशतवादी अबू कासिम, अबू दुजाना, बुरहान वानी आणि झाकीर मुसा यांचा जवळचा सहकारी होता, अशी माहिती ही समोर आली आहे.
हमजा बुरहान कोण होता?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरहानचे खरे नाव अर्जुमंद गुलजार दार आहे. हमजा बुरहान पुलवामा येथील रत्नीपोराचा रहिवासी होता. २०१७ मध्ये, हमजा पाकिस्तानात गेला आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला. अल-बद्र ही भारतात एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून सूचीबद्ध केली आहे. हमजा अल-बद्रचा कमांडर होता. भारतीय गृह मंत्रालयाने २०२२ मध्ये त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले. पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्याचा तो मुख्य मास्टरमाइंड होता असा आरोप आहे.









