Farmer Onion Crisis: उत्पादन खर्च हजारात विक्री शेकड्यात अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, बाजार समित्यांमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चांदवड चौफुलीवर ठिय्या आंदोलन केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Onion Farmers) प्रश्नावर महाविकास आघाडी (मविआ) आक्रमक झाली असून चांदवड येथे ठिय्या आंदोलन करून रास्ता करण्यात आला, यावेळी कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.यावेळी रोहित पवार अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे कांद्याला रास्तभाव मिळावा यासाठी मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी कांद्याला किमान २४ रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला १५ रुपये अनुदान (Subsidy) मिळावे, या मागण्यांसाठी आज आक्रोश महामोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि खा शोभा बच्छाव, भास्कर भगरे, अनिल कदम, खा राजाभाऊ वाजे, गजानन शेलार, आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी हजारोच्या संख्यने आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती.

पोलीस बाळाचा वापर, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न: रोहित पवार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का? आम्हाला आज अटक करून हा प्रश्न सुटला, असं सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. १८ तारखेच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने ३ रुपये वाढवले आणि आजच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन मुंबईपासून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असून उद्या दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्या बैठका होणार आहेत, हे शेतकरी एकजुटीचे यश आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नसून उद्याच्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही, तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली लढाई तीव्र करतील आणि ते मात्र या सरकारला परवडणारे नसेल, हे या सरकारने ध्यानात घ्यावे.
सोलापूर, औरंगाबाद येथे ही शेतकरी रस्त्यावर
सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात आंदोलन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो अवघा सव्वा रुपया दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. नरहरी रांजणगाव येथील शेतकरी लक्ष्मण दुशिंग यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल अवघे 125 रुपये भाव मिळाला. कांद्याला भाव नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर-वैजापूर महामार्गाच्या गेटसमोर सर्व कांदे रस्त्यावर फेकून देत ‘रास्ता रोको’ आंदोलन केला.







