Nashik News: संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या अगोदर होऊन गेलेले सर्व समाजधुरीण पाश्चात्य संस्कृतीचे, भाषेचे आणि जीवनशैलीचेही जाणकार होते. पण गाडगेबाबांनी जी काही केलं ते समाज निरिक्षणातुण केलं आहे आणि हेच त्यांचे सगळ्यात मोठे वेगळेपण आहे. गाडगेबाबांना जसे समाजाचे वर्म माहीत होतं, तशी समाजाची भाषाही माहीत होती. नुसती माहीतच नव्हती तर त्यांच्या आचरणात होती. असे प्रतिपादन वारकरी कीर्तनकार ह. भ. प. सचिन महाराज पवार यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याखानात त्यांनी ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा’ या विषयावर कीर्तन सेवा अर्पण केली. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
स्व. डॉ. सुराणा यांचे बंधु अजित सुराणा, पोपट सुराणा, सुभाष नहार व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा अर्धपुतळा व स्व. डॉ. सुभाष सुराणा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हर्षवर्धन बोराडे यांनी परिचय करून दिला. संत गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक कुणाल देशमुख, नाना गवळी, विजय देसाई यांनी स्वागत केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. कृष्णा शहाणे यांनी आभार मानले.

दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज प्रसिध्द चित्रकार डॉ. दिलीप चोपडेकर यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. डॉ. चोपडेकर यांनी आतापर्यंत हजारो व्यक्तीचित्रे काढलेली आहेत. त्यामध्ये भगवंत, संत, महंत, ज्ञानवंत, गुणवंत, समाजसेवक, तसेच हिंदी- मराठी अभिनेते, अभिनेत्री, नाशिकमधील राजकीय नेते आदी निवडक मान्यवरांची रेखाचित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. ही व्यक्तिचित्रे पाहून रसिक श्रोत्यांनी मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला. ह. भ. प. सचिन महाराज यांच्या हस्ते डॉ. चोपडेकर यांना गौरविण्यात आले.
सचिन महाराज म्हणाले की, गाडगेबाबा जसे संत आहेत, तसे ते समाज सुधारक आणि समाज उद्धारकही आहेत. त्यामुळे वारकरी परंपरेचा उत्कर्ष जर कशात असेल तर तो राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या चरित्र वाचनात आहे. गाडगेबाबा हे एकमेव असे संत होते, ज्यांनी धर्मामध्ये सेवेची भावना ओळखली आणि रुजवलीदेखील. धर्म आणि सेवेचा मिलाफ ही संकल्पनाच त्याकाळी कुणाला माहीत नव्हती. त्यामुळे ते भारतीय प्रबोधनाचे देशी अवतार होते. त्यांनी स्वच्छतेपासून समतेपर्यंत विचार केला. यासारख्या अनेक कार्याचा सविस्तर उहापोह करत पवार यांनी गाडगेबाबा यांचे मोठेपण, त्यांचे योगदान, त्यांचे विचार आणि त्यांचे वेगळेपणदेखील अधोरेखित केले.
त्यासाठी त्यांनी तत्कालीन परिस्थिती, समाज सुधारक आदींची उदाहरणे देत त्यांनी गाडगे महाराजांची स्थितप्रज्ञता, निस्पृहता, त्यांचा त्याग, समाजाप्रतिची त्यांची भावना आदींबाबतही विवेचन केले. ते अत्यंत निश्चयी आणि खमक्या माणूस होते. त्यांच्या बोलण्यात केवळ विचारच नाही, तर तत्वज्ञान होते. त्यातूनच त्यांनी वेळोवेळी समाजाला जसे शिकवले, तसे प्रसंगी खडसावले देखील आहे, या बाबतीत ते थेट संत तुकाराम महाराजांसारखे वैराग्याच्या उंचीचे होते, असेही ते म्हणाले. ते देव मानणारे होते, तरीदेखील ते कर्मकांडाचे विरोधक होते. पशुहत्येला त्यांचा विरोध होता. ही बाबदेखील त्यांनी अलीकडच्या काळातील उदाहरणांसह पटवून दिली.
मुकेशच्या गायकिला अनोखा सलाम
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रांत आज उमेश मालवी प्रस्तुत ‘स्वराधीश मुकेश’ हा मुकेश यांनी गायिलेल्या अजरामर गितांचा कार्यक्रम झाला. यामध्ये श्री. मालवी यांच्यासह हरिशभाई ठक्कर, विनोद सरदेशमुख, अश्विनी सरदेशमुख, अर्चना सोनवणे यांनी जुनी लोकप्रिय गाणी सादर केली. श्री. ठक्कर यांनी वैशिष्ट्यपूर्ण शैलीत निवेदन करत या अजरामर गाण्यांच्या मैफलीद्वारे गायक मुकेश यांनी स्वरांजली अर्पण केली.







