Nashik News: शारीरिक व्याधिंबरोबरच अन्य प्रकारचे आजार आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी या बाबी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे. त्यातूनच आपण निरोगी जीवन जगू शकतो. तर मौखिक आरोग्य हा खासकरून कर्करोगाशी संबंधित विषय असल्याने याबाबत मोठ्याप्रमाणावर जनजागृती होणे आणि प्राथमिक आवस्थेतच निदान व उपचार होणे गरजेचे आहे. अशी माहिती वसंत व्याख्यानमालेच्या 26 व्या पुष्पात देण्यात आली. व्याख्यानमालेत स्व. स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यानात प्रसिध्द अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजय धुर्जड यांनी ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर, तर प्रसिध्द मुख कर्करोग तज्ज्ञ डॉ. विशाल जाधव यांनी ‘मुख कर्करोग समजून घेणे काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. विक्रांत जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. स्मिता जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. निवृत्त मुख्याध्यापक बी. टी. जाधव व प्रशांत परदेशी यांनी स्वागत केले. दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज कलानिकेतन महाविद्यालयातील एटीडी द्वितीय वर्षाचे जयेश जुन्नरे, दिलीप राजभर, जागृती पाटील, रोहन सरोदे, पुजा बैरागी, रोशनी सुतार, प्रगती चांगोले, किमया गवळी, मोनिका गहीले, प्रतिभा शिंदे, रोहित पारधी, तेजस्विनी कदम, ईशा देवडिगा, रेणुका भागवत, रेणुका केव्हारे, निकिता लांडगे या विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या विविध चित्रकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विविध शैलीतील या कलाकृतींचा आस्वाद घेतानाच, रसिक प्रेक्षकांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. धुर्जड म्हणाले की, आपल्या आयुष्याचे आरोग्याच्या दृष्टीने प्रामुख्याने चार विभाग केले जाऊ शकतात. त्यापैकी आपल्याला केवळ शारीरिक व्याधीचीच माहिती असते. मात्र त्याचवेळी मानसिक आरोग्य, भावनिक व्याधी आदींबाबतही आपण जागृत असणे गरजेचे असते. यावेळी डॉ. धुर्जड यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी प्रामुख्याने काय केले पाहिजे याबाबत काही सोपे मुलमंत्र यावेळी दिले. त्यात योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, बौद्धिक व्यायामासाठी वाचन, लेखन, अभ्यास, नवीन कौशल्य शिकणे खुप महत्वाचे ठरतात. त्याचबरोबर व्यायाम कसा करावा, वाचन का व कसे करायचे आदींबाबतही मार्गदर्शन केले. त्याच बरोबर अध्यात्माच्या माध्यमातूनही आपण आपल्या क्षमता वाढवु शकतो. त्याचवेळी आपल्या सामाजिक भाव-भावनादेखील आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आकस, पूर्वग्रह, निराशा यासारख्या भावनांवर नियंत्रण मिळविणेही गरजेचे असते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, डॉ. जाधव यांनी कर्करोगाशी लढा देताना किंवा तो होऊच नये यासाठी काय केले पाहिजे याची माहिती दिली. ते म्हणाले की कर्करोग हा प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येत नाही. त्यामुळे कर्करोग होऊच नये यासाठी वृत्तपत्र, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून आपण जनजागृती व प्रचार-प्रसार करू शकतो. तसेच आपल्या आहार- विहाराच्या सवयीसुद्धा आपल्याला कर्करोगापासून दूर ठेवू शकतात. त्यामुळे आहार, विहार आणि सवयी याबाबत जागरूक राहणे गरजेचे ठरते, असेही ते म्हणाले.







