Nashik News: अन्यायाशी लढण्याची वृत्ती, चांगला माणुस बनण्याचा ध्यास आणि अरविंद पटवर्धन यांचे मार्गदर्शन यातून पोलिस खात्यात यशस्वी कारकीर्द घडवली. त्याचवेळी प्रसंगानुरुप दाखवलेल्या धाडसातूनही कारकीर्द घडत गेली. असे प्रतिपादन, कुख्यात तस्कर चार्ल्स शोभराजला पकडणारे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर झेंडे यांनी येथे केले.
तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत स्व. लक्ष्मणराव (काका) तांबे स्मृती व्याखानात ते ‘माझी पोलीस खात्यातील कारकीर्द’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेच्या उपाध्यक्ष उषा तांबे व्यासपीठावर उपस्थित होत्या. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. लक्ष्मणराव तांबे व स्व. नवलनाथ तांबे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेंद्र बाफणा यांनी झेंडे यांचे, तर प्रा. कृष्णा शहाणे यांनी श्रीमती तांबे यांचे स्वागत केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. दरम्यान, व्याख्यानमालेच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात निलेश गजबे आणि ज्ञानेश्वर टोणपे यांच्या कलाकृती सादर करण्यात आल्या.

रसिक नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहित केले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. झेंडे यांनी सुरुवातीला झेंडे परिवाराचा झेंडेवाडी ते पुणे हा प्रवास सांगितला. विद्यार्थी दशेत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला अन् पुढे इंटर सायन्सला असतानाच पोलीस दलात दाखल झालो. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे याचे बाळकडु सेवादलातून मिळाले. असे अनेक प्रसंग सांगत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा पट उलगडला.
यामध्ये त्यांनी आपली प्रेम कहाणी, वडिलांचा राग, घटस्फोट आदी प्रसंग अत्यंत प्रांजळपणे मांडले. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या परेडसाठी झालेली निवड यासारखे अभिमानास्पद अनुभव आणि सुरुवातीच्या काळात मुंबईत सहन करावा लागलेला त्रास आदी आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. अरविंद पटवर्धन यांच्याकडून विल्यम स्लिमन, बॉबी पोलीस, रॉबर्ट पिल यांचे विशेष दल आदींच्या प्रेरणादायी कथा आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची कार्यशैली आदींच्या प्रेरणादायी कथा ऐकुन आम्ही आमच्या कारकिर्दीला आकार दिल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. त्याचबरोबर हाजी मस्तान, अरुण गवळी, चार्ल्स शोभराज या सारख्या गुंडांविरुध्द लढतानाच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.
‘बॉलीवुड नाईट’मध्ये नाशिककर थीरकले
व्याखानानंतर सायक्लोन डान्स अकादमी प्रस्तुत ‘बॉलीवुड नाईट’ हा भव्य- दिव्य असा डान्स शो झाला. यामधील निवडक नृत्यांवर रसिक नाशिककरांची पावलं आपोआप थीरकली. हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या व नृत्यप्रधान व बहारदार गाण्यांच्या तालावर थीरकण्याचा मनमुराद आनंद नाशिककरांनी या निमित्ताने लुटला. अकादमीचे संस्थापक दिग्दर्शक जतींदर सिंग (चीकी), अँड. लीना शेख- अहिरे, हीतेशभाई शाह आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाविष्काराद्वारे रसिकांची मने जिंकली.







