America- Israel On Iran: इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थामार्फत चर्चा सुरू असून, संघर्ष विरामाच्या एका कराराचा मसूदा तयार करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. त्यासाठी, दोन्ही बाजूकडून सकारात्मक संदेश आणि मसुद्यांची देवाणघेवाण केली जात आहे, असे इराणच्या आयएसएनए (ISNA) वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यामुळे यातून काही चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा पश्चिम आशिया आणि या संघर्षाचा परिणाम झालेल्या देशांना आहे.
पाकिस्तानी अधिकारी मध्यस्थता करण्यात गुंतले आहेत, तर एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने करार जवळ आल्याचे म्हटले आहे. असे अल जंजिराने वृत्त दिले आहे. मात्र इराणच्या एका दुसऱ्या अधिकाऱ्याने अंतिम करार होऊ शकेल की नाही, हे सांगणे सध्या खूप घाईचे ठरेल, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी गुरुवारी सकाळी सांगितले की, करारासाठी काही चांगले संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर इराणने आपला युरेनियमचा साठा सोडला नाही, तर कठोर कारवाई केली जाईल, या एकूणच अनिश्चितेच्या वातावरणात पुन्हा एकदा चर्चा करण्याचे दोन्ही पक्षांनी संकेत दिल्याने त्यातून काही सकारात्मक निघेल असे सध्या दिसत आहे.

दरम्यान इस्रायलने सांगितले की, त्यांनी गाझात मदत घेऊन येणाऱ्या जहाजांच्या ताफ्यात सहभागी असलेल्या सर्व परदेशी कार्यकर्त्यांना देशाबाहेर काढले आहे. इस्रायली सैन्य आणि इस्रायलचे सुरक्षा मंत्री, इतामार बेन-ग्विर यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल जगभरातून तीव्र निषेध व्यक्त झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
लेबनॉनमध्ये झालेल्या हल्ल्यात ६ ठार
इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर आपला प्राणघातक बॉम्बवर्षाव सुरूच ठेवला असून, शुक्रवारी पहाटे त्यात किमान सहा जण ठार झाले. दरम्यान, इस्रायली सैन्याने एका सरकारी रुग्णालयावर हल्ला करून अनेक कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना जखमी केल्यानंतर लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने संताप व्यक्त केला आहे.









