Nashik News: बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात, कुंचल्याच्या प्रत्येक फटकाऱ्यात मर्म आहे. याच मर्मभेदी विचारांतून त्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी ‘मार्मिक’ सुरू केले. याच अंकात त्यांनी ‘वाचा आणि थंड बसा’ अशा मर्मभेदी संदेश दिला. पुढे आयुष्यभर अत्यंत मर्मभेदी वृत्तीने महाराष्ट्राची जडणघडण केली. यावरून लक्षात येते की त्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे मर्म जाणले होते. असे प्रतिपादन लोकसभेतील शिवसेनेचे (ऊबाठा) गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी येथे केले.
नाशिकच्या तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत सोमवारी त्यांनी स्व. राधाकिसन चांडक स्मृती व्याखानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘मर्मभेदी बाळासाहेब’ या विषयावर विचार मांडले. खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रथमेश गीते व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा आणि स्व. राधाकिसन चांडक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरेश शहाणे, विजय काकड, दत्तात्रय कोठावदे, राजेंद्र शेळके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

दरम्यान, व्याख्यानमालेसोबतच अन्य कलाकारांनाही व्यासपीठ देण्याच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनात आज अदिती अविनाश भिडे यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. रसिक नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट देऊन या चित्रकृतीचे कौतुक केले. पाहुण्यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
खासदार सावंत म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी हाल सहन केले, पण त्यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता आला, हे त्यांचे भाग्य होते. तद्वतच स्वातंत्र्यानंतर जन्म घेऊनसुद्धा आम्हाला बाळासाहेब लाभले हे आमचं भाग्य आहे. आज मी येथे केवळ त्यांच्यामुळेच उभा आहे. मुळात शिवसेनेची स्थापनाच राजकारणासाठी नसून समाजकारणासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झाली होती. प्रबोधनकारांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन या बळावर बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली.
बाळासाहेबांची प्रत्येक कृती मर्मभेदी होती. कामगार सेना, विद्यार्थीसेना असे अनेक प्रयत्न करून त्यांनी मराठी माणसाची अस्मिता जपली. असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी संबंधित अनेक मर्मभेदी आठवणी उदाहरणांसह सांगितल्या. मर्मभेदाचा हा वारसा त्यांनी प्रबोधनकारांकडून घेतला असला तरी पुढे त्याला आपल्या कर्तूत्वाने अधिक प्रखर बनविले. आज मात्र हाच वारसा सांगुन राजकारणाच्या नावाखाली समाजाची वाट लावण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. गद्दारीची त्यांना प्रचंड चीड होती असा खोचक चिमटाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता काढला. श्रीरामाने हनुमानाला खोके देवून विकत घेतले नव्हते असा टोमणाही त्यांनी यावेळी मारला.
‘सदाबहार चित्रहार’ची नाशिककरांना भुरळ
व्याखानमालेच्या दुसऱ्या सत्रांत आज सरगम सुगम संगीत क्लासेसतर्फे ‘चित्रहार भाग- 2’च्या माध्यमातून आठवणितिल सदाबहार जुन्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये नमिता राजहंस, ऐश्वर्या गडकरी, नीलम भराडे, निश्मिता प्रभू, किर्ती कोल्हे, हितेंद्र शर्मा, अनघा निमगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात विविध गाणी सादर केली. या सदाबहार गीतांनी आणि हरहुन्नरी कलावंतांच्या सादरीकरणाने रसिक नाशिककरांना जणू भुरळ घातली, इतक्या तन्मयतेने रसिक या मैफलीत रंगून गेल्याचे बघावयास मिळाले.







