होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सुरगाण्यातील सातबाभळच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘वानखेडे’चा थरार

On: May 26, 2026 2:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद सातबाभळ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रविवारचा दिवस आयुष्यातील अविस्मरणीय ठरला. दिव्य फाउंडेशन, नाशिक आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यार्थ्यांना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर प्रत्यक्ष आयपीएल सामना पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा रोमांचक सामना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून अनुभवला.

ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांनी क्रिकेट फक्त दूरदर्शन किंवा मोबाईलवर पाहिले होते. मात्र, प्रथमच त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हजारो प्रेक्षकांचा जल्लोष, स्टेडियममधील रोषणाई आणि थरारक वातावरण जवळून अनुभवले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि आश्चर्य यामुळे हा उपक्रम अधिक संस्मरणीय ठरला.

या उपक्रमामागे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच जगाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांची स्वप्ने मोठी व्हावीत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षक कुसुम राऊत व खंडू मोरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अनुभवात्मक उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या विशेष उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी नाशिक येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत खाऊ वाटप केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, सुरगाणा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी, केंद्रप्रमुख पंडित पवार तसेच सहाय्यक केंद्रप्रमुख विनायक चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या दिव्य फाउंडेशन, नाशिकच्या सर्व सदस्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्या रिलायन्स फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका छोट्याशा प्रयत्नातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि नवे पंख मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment