Nashik News: अर्धवट माहिती, भीती आणि क्वचित प्रसंगी अतिआत्मविश्वास यामुळे आर्थिक गुंतवणुकीबाबत संभ्रम असतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीचाही हा परिणाम असू शकतो. कारण या परिस्थितीत जगभरातील अर्थकरणावर परिणाम होत आहे. त्यामुळे रिस्क, चांगला परतावा, सुरक्षितता आदींचा विचार अवश्य केला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील वित्तीय जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक शिंपी यांनी येथे केले.
नाशिकची 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यानाचे 25 वे पुष्प गुंफताना त्यांनी ‘गुंतवणुकीचे विविध पर्याय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि जागतिक परिस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनिल गवादे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. माणेकलालजी भटेवरा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कांतीलाल तातेड व मनीष सानप यांनी स्वागत केले.
दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज कलानिकेतन महाविद्यालयातील स्नेहल गायकवाड, कृष्णा विश्वकर्मा, वीजल बोरसे, अर्चना हराळे, सृष्टी जाधव, लावण्या माळी, आदित्य बुराडे, निखिल साटोटे, निकिता चव्हाण, तमन्ना रंगारी, सृष्टी पुकळे, भाग्यश्री सोनवणे, वृंदा कोरडे, पल्लवी विश्वकर्मा, हर्षद वाघ या विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या विविध चित्रकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विविध चित्रशैलीतील या कलाकृतींचे रसिकांनी मनःपूर्वक कौतुक केले.

शिंपी म्हणाले की, परतावा जास्त हवा असेल तर पाच लाखापर्यंतची गुंतवणुक नेहमीच सुरक्षित मानली जाते. सध्या फक्त टपाल खात्याची एनएससी योजनाच सर्वाधिक व्याजदर देणारी आहे. या शिवाय सिनियर सिटिजन्स आणि सुकन्या समृद्धी योजना सर्वांत चांगल्या आहेत. असे सांगत त्यांनी या योजनांचे लाभ, कालावधी, तांत्रिक बाबी, अडचणी आणि सुविधा आदींचीही माहिती दिली. तसेच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंडची निवड करता येईल. तसेच सुरक्षित गुंतवणुकीसाठीही स्मॉल फायनान्सचाही पर्याय चांगला आहे. याच बरोबर काही मार्केट बेस योजनाही चांगल्या आहेत. त्यात रिस्क असली, तरी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चांगला परतावा मिळु शकतो. त्याचप्रमाणे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आदी अनेक मार्ग आहेत. परंतु यामध्ये गुंतवणुक करताना या कंपन्यांचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे असे सांगत त्यांनी या क्षेत्रातील काही धोकेही यावेळी नमुद केले. त्याचबरोबर सोने, चांदी, दागिने, रियल इस्टेट, इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, एसआयएफ, पीएमएस आणि एआयएफ आदी पर्यायांचाही त्यांनी यावेळी उहापोह केला.
रसिकांनी लुटला बहारदार गाण्यांचा आनंद
व्याख्यानानंतरच्या दुसऱ्या सत्रांत नाशिककरांनी घनश्याम पटेल प्रस्तुत ‘सूर शारदा म्युझिकल नाईट’ अर्थात मेलोडियस सॉग इव्हीनिंग या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. यामध्ये संजय डेरे, मनोहर देवरे, अजय पाटील, स्मिता पांडे, डॉ. रेखा सोनवणे, नीता पवार, सानिका जैन, डॉ. गोपाल सोनवणे, डॉ. ज्योती सोनवणे व नूतन मिस्त्री यांनी विविध गीतं सादर केली. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे यांनी सांभाळली. अमोल पाळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.







