Jalgaon News: जळगाव आणी आजूबाजूच्या भागात उष्ण हवामानाने नागरिक हैराण झाले आहे, जळगावचे तापमान ही ४४ ते ४५ अंशापर्यंत जात आहे, ऊष्म्याने नागरिक अस्वस्थ झाले आहे, त्यातच जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आज दिसत असलेले ढगाळ वातावरण दिलासादायक असून पावसाबाबत चर्चा सुरू झाली असली, तरी सध्या मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी सांगितले आहे. अरबी समुद्रात वाढलेली आर्द्रता आणि दक्षिण-पश्चिम वाऱ्यांमुळे मुंबई, कोकण आणि केरळ किनारपट्टी भागात ढगांची मोठी निर्मिती होत असून, त्याचाच परिणाम उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात दिसत आहे.
मात्र ही प्रणाली सध्या मुख्यतः किनारपट्टी भागात सक्रिय असल्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये सतत किंवा व्यापक पाऊस अपेक्षित नाही. काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या सरी किंवा विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस होऊ शकतो. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला असला तरी उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, मान्सूनचा थेट प्रभाव उत्तर महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे निलेश गोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पुणे वेधशाळेने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे काही ठिकाणी वातावरण उष्ण आणि कोरडे आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता आहे. दुपारपासूनच हवामानात थोडा गारवा आहे, वातावरण ढगाळ सदृश्य झाले आहे, काळे ढग जमा झाल्याने पावसाची शक्यता आहे.







