Bhusawal News: जळगाव जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असताना, काही दिवसांपूर्वी एक तरुणी जळगाव शहरात आढळली होती. त्यानंतर आता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका बांगलादेशी महिलेचा शोध घेण्यात मोठे यश मिळाले आहे. बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास राहणाऱ्या या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे.
पोलीस तपासात संशयित महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (४२) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती मूळची बांगलादेशातील भीमकाठी (उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर) येथील रहिवासी आहे. भारतात आल्यानंतर तिने स्वतःची ओळख लपवण्यासाठी “जस्मिन बी मोहम्मद खान” हे नाव धारण केले होते. या नावाने ती गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरातील दीनदयाल नगर परिसरात वास्तव्यास होती. स्थानिक पातळीवर भारतीय नागरिक असल्याचे भासवून ती सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तांत्रिक आणि दस्तऐवजी पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

2009 पासून भारतात वास्तव्य
प्राथमिक चौकशीत संशयित महिलेने सन 2009 मध्ये एका मध्यस्थाच्या मदतीने बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. यासाठी तिने मध्यस्थाला पाच हजार रुपये दिले होते. नदीमार्गे बोटीच्या सहाय्याने ती प्रथम पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. त्यानंतर रेल्वेमार्गे भुसावळ येथे पोहोचल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताकडून सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी जप्त केला. या भ्रमणध्वनीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असता आएमओ आणि व्हाटस्ॲपच्या माध्यमातून बांगलादेशातील +८८० कंट्री कोड असलेल्या अनेक भ्रमणध्वनी क्रमांकांशी सातत्याने संपर्क झाल्याचे उघड झाले. भ्रमणध्वनीमध्ये चॅटिंग, व्हिडिओ कॉल तसेच इतर संवादांचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. याशिवाय संशयित महिलेच्या मोबाईलमध्ये तिच्या बांगलादेशातील जन्म दाखल्याची प्रत आढळून आल्याने तिची खरी ओळख निश्चित करण्यात पोलिसांना मदत झाली.
बनावट दस्तऐवजाचे रॅकेट
पुढील चौकशीत संशयित महिलेने अत्यंत चलाखीने भारतीय कागदपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल तसेच इतर स्थानिक कागदपत्रांचा वापर करून तिने स्वतःचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे उघड झाले आहे. या सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे ती अनेक वर्षे भारतात राहत होती. विशेष म्हणजे बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे संशयित महिला मे 2023 मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची धक्कादायक बाबही तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे संबंधित प्रकरण केवळ बेकायदेशीर वास्तव्यापुरते मर्यादित नसून बनावट दस्तऐवज रॅकेट आणि आंतरराष्ट्रीय हालचालींशी संबंधित मोठे नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.









