Global Water Day: जागतिक जल दिन दरवर्षी २२ मार्च रोजी साजरा केला जातो. पाणी आहे तर जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊनच, गोड्या पाण्याच्या स्रोतावर लक्ष केंद्रित करणे आणि गोड्या पाण्याच्या संसाधनांचे संवर्धन करून त्याचे काटेकोर व्यवस्थापन करण्याचे महत्त्व सांगितले जाते, जीवसृष्टीसाठी गोड्या पाण्याचे स्रोत जतन करुन ते संरक्षित करणे गरजेचे आहे. पाण्याविषयी जागरूकता वाढवणे महत्त्वाचे कार्य आहे, त्याला कृतिशीलतेची जोड देण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो. प्रत्येकाला ताजे आणि स्वच्छ जल मिळायला हवे, त्यासाठी जल शुद्ध राहील याची काळजी घेतली पाहिजे. शुद्ध जल किती जणांना मिळते तर त्याचे प्रमाण कमी आहे. एका आकडेवारीनुसार २ अब्जांहून अधिक लोकांना घरात शुद्ध पाणी मिळत नाही. आपणच आपले साठे दूषित करतो. पाण्याचा थेट आपल्या जीवनाशी संबंध येत असल्यानं त्याचं शुद्ध असणे गरजेचे आहे.
पाण्याचे चांगले व्यवस्थापन आणि संरक्षण काळाची गरज आहे. काही पावसाळी भागात मोठया प्रमाणात पाऊस पडतो मात्र ते पाणी साठवणूक करण्याची जी व्यवस्था हवी ती आपल्याकडे नाही, त्यामुळे ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. पाण्याचे मोल आपल्याला नसल्याने त्याचा आपल्याला उपयोग होत नाही, त्यासाठी छोटी मोठी तलाव आणि धरणे यामध्ये पाण्याची साठवण आणि व्यवस्थापन करता येऊ शकेल. जो पर्यंत जल आहे तो पर्यंतच जीवन आहे. अशी पक्की खूणगाठ बांधणे गरजेचे आहे. भावी पिढीसाठी पाण्याचे संरक्षण करुन त्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उपक्रमांना पुढील काळात प्राधान्य द्यावे लागेल. टिकाऊ व्यवस्थापन करावे लागेल. २०३० पर्यंत सर्वांसाठी टिकाऊ आणि स्वच्छ जल पुरवण्याचा यूएनचा ध्यास आहे. आपल्या समोर अनेक जागतिक समस्या आहे. हवामान बदल, पाणी प्रदूषण यासारखी अनेक आव्हाने आहे, खास करुन घरातील पाण्याचा वापर कसा करावा तसेच व्यावसायिक आणि इतर आस्थापनामध्ये पाणी वापर कसे असावे, याबाबत मोठी जनजागृती करावी लागेल. भविष्यात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण होईल, हे संकट थोपविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन आताच करावे लागेल. त्यासाठी चागल्या पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील.
२०२४ मध्ये शांतीसाठी पाण्याचा वापर ही थीम घेऊन विविध जल संघटनांनी जागृतीपर उपक्रम हाती घेतले होते. २०२६ मध्ये ही पाण्याचा भेदभाव न करता एक समान वाटप करण्याचे महत्त्व विशद करणारी थीम राबविण्यात आली. याचा उद्देश असा होता की ज्या ठिकाणी पाणी वाहते त्याठिकाणी समानता राखण्याचा प्रयत्न करणे. पाण्याच्या महत्त्वपूर्ण संसाधनाला समजून घेण्यासाठी, त्याचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी युनेस्को जागतिक स्तरावर काम करत आहे. आंतरशासकीय जलविज्ञान कार्यक्रम (IHP) आणि जागतिक जल मूल्यांकन कार्यक्रम (WWAP) राबविले जाऊन, युनेस्को अत्याधुनिक विज्ञानाला व्यावहारिक उपायांशी जोडत आहे. त्यामुळे जगभरात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यास, हवामान बदलाशी जुळवून घेण्यास आणि आंतरराष्ट्रीय जलस्रोतांचे अधिक प्रभावीपणे वाटप करण्यास मदत होते.
या क्षेत्रात सक्रिय असलेल्या युनिसेफ (UNICEF), वॉटरएड (WaterAid) आणि वॉटर अँड सॅनिटेशन फॉर द अर्बन पुअर (WSUP) यांसारख्या अशासकीय संस्था या पाण्याच्या समस्यांबद्दल जनजागृती करतात, तसेच लोकांचे आणि माध्यमांचे लक्ष वेधण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला कृती आणि प्रेरणा देऊन या दिवसाचा प्रभावी उपयोग करतात. या उपक्रमांमध्ये विविध प्रकाशने आणि चित्रपट प्रदर्शित करून माहिती दिली जातेे, तसेच गोलमेज चर्चा, परिसंवाद घेण्यात येतात, त्यातून सकारात्मक बाजूंवर लक्ष केंद्रित केले जाते, तसेच प्रदर्शने आयोजित करून पाण्याचे महत्त्व सांगितले जाते. त्यासाठी आता सुमारे २५० भागीदारांची एक संस्था जागतिक नागरी समाज आघाडी, दरवर्षी वॉटर ॲक्शन मंथ (Water Action Month) आयोजित करते. त्यामध्यामतून विविध कार्यक्रमाचे नियोजन आणि रूपरेषा उपलब्ध करून दिली जाते.
संयुक्त राष्ट्रांचा जागतिक जल विकास अहवाल (UN World Water Development Report) दरवर्षी जागतिक जल दिनी प्रसिद्ध होतो. वार्षिक संकल्पनेशी संबंधित माहिती आणि जल संसाधनांचा शाश्वत वापर करून साधने पुरविण्यावर भर देतो. शाळा आणि विद्यापीठांमधील अधिकाधिक लोकांना विशेष करून विद्यार्थ्यांना जल संसाधनांचे संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयी शिक्षण देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करतो. उदाहरण द्याचेच झाले तर मिशिगन स्टेट विद्यापीठाने २०१७ मध्ये ‘जागतिक जल दिन पोस्टर’ स्पर्धा आयोजित केली होती. फिलिपिन्समध्ये २०१० मध्ये प्राथमिक शाळेतील मुलांनी ‘माझे शाळेतील शौचालय’ स्पर्धेत भाग घेतला होता. अशा उपक्रमांद्वारे थेट संवाद घडून जनजागृती करण्यात आली. जल स्त्रोतांचे संरक्षण, साठवण, व्यवस्थापन करण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करून त्यावर कृतिशील रहावे लागेल. या माध्यमातून भविष्यातील पाण्याच्या समस्यांवर मात करणे शक्य होईल.





