Nashik News: हिंद की चादर ही दोन धर्मांना एकत्र आणण्याची संकल्पना आहे. हिंद की चादर हा उल्लेख गुरू तेग बहादुर यांच्या संबंधांने येतो आणि त्यांचा त्याग म्हणजेच ते हिंदु धर्म संरक्षणासाठी एखाद्या चादरीप्रमाणे आवरण म्हणुन धावून आले होते. त्यांच्या या बलिदानास यंदा 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने ‘हिंद की चादर’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. असे प्रतिपादन नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शीख धर्माचे गाढे अभ्यासक रवींद्रसिंघ मोदी यांनी येथे केले.
वसंत व्याख्यानमालेच्या 103 व्या ज्ञानसत्रातील अंतिम पुष्प मोदी यांनी गुंफले. स्व. अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यानात श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त ‘हिंद की चादर’ या विषयावर विचार मांडले. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. अर्जुनसिंग बग्गा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्षा प्रा. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. रमेश खापरे यांनी स्वागत केले. सोशल मीडिया इन्फ्ल्युअर पार्थ कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.

दरम्यान, व्याख्यानमालेतर्फे भरविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात विवेक रनाळकर यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेषतः व्यक्तीचित्र, विविध जाहिरातींचे चित्रण आणि अन्य आकर्षक चित्रांनी नाशिककरांना आकर्षित केले. मोदी म्हणाले की, भारतात वेगवेगळे धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या सर्व धर्मांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यातील सर्वात मोठा आणि प्राचीन धर्म म्हणजे हिंदु धर्म असल्याचे सांगून त्यांनी गुरू नानक यांच्या काळातील इतिहास आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील काही प्रसंगांचाही आढावा घेतला.
हिंदुस्थान पूर्वीही एक राष्ट्र होते आणि आजही ते राष्ट्रच आहे. त्यात शीख धर्म हा स्वतंत्र धर्म असल्याचे सांगत त्यांनी शीख धर्म हा हिंदु धर्माची एक शाखा आहे यावर आपला आक्षेप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की गुरु नानक यांचे पूर्वज हिंदु होते. त्यांच्या कुटुंबात चारपैकी तीन वेदांचा अभ्यास होत असे. मात्र पुढील काळात अनेक धर्मांचा अभ्यास करून त्यांनी कर्तारपूर येथे शीख धर्माची स्थापना केली. हा धर्म एकेश्वरवाद मानणार आहे. त्यामुळे या धर्माचे अनुयायी अन्य धर्मांचा विरोध करत नाही. पण शीख हा स्वतंत्र धर्म आहे, असेच ते मानतात. असे सांगत त्यांनी शीख धर्माच्या नऊ गुरूंची परंपरा आणि इतिहास विशद केला. त्याचप्रमाणे गुरू तेग बहादूर यांची धर्मगुरु म्हणून निवड आणि त्यांच्या एकुणच कार्याचा पट त्यांनी उलगडून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन असल्याने मराठे आणि राजपूतांच्या इतिहासातील काही प्रसंग सांगत त्यांनी तेग बहादुर साहेब यांच्या बलिदानाचा आणि शौर्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘महफिल-ए-ईश्क’मध्ये रमले नाशिककर
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रांत ऋषिकेश शेलार प्रस्तुत ‘महफिल-ए-ईश्क’ ही विशेष मैफल रंगली. यामध्ये श्री. शेलार यांना अनिल धुमाळ (किबोर्ड), गौरव तांबे (तबला) व आकाश बैरागी (ढोलक) यांनी संगीतसाथ केली तर कोरसमध्ये अनिकेत शेलार, प्रसाद चिने, विक्रम नन्नवरे यांनी मोलाची साथ दिली. या विशेष आणि सुंदर अशा मैफलीत श्रोते तल्लीन झाले होते.









