Latest Weather Update: मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन केले आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी- आपत्ती विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन
आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटावेळी झाड, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे. तसेच आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी.
हवामान विभागाने दिलेला इशारा (कुलाबा वेधशाळा)
महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी कुलाबा वेधशाळेने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या बुलेटिनमध्ये हवामानाचा अंदाज दिला आहे, दि. ६ ते १० जून दरम्यान हवामानाचा अंदाज कसा राहील यांची माहिती देण्यात आली आहे.
०६ जून: कोकण आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता. दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी ४०-५० किमी ( ६० किमी प्रतितास ) वेगाने वारे वाहण्याची व वादळी हवामानाची शक्यता.
०७ जून: कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता. दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी ४०-५० किमी (ताशी ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची व वादळी हवामानाची शक्यता.
०८ जून: कोकण आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता. विदर्भातील तुरळक ठिकाणी ताशी ५०-६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी ४०-५० किमी (झोतासह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची व वादळी हवामानाची शक्यता.
०९ जून: कोकण आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर व लगतच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह (वेग ताशी ४०-५० किमी, काही ठिकाणी ६० किमीपर्यंत) हवामान राहण्याची शक्यता आहे.
१० जून: कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (वेग ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता आहे.०७ जून: कोकण आणि गोव्यातील अनेक ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी; आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.









