होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी ‘या’ पाच रेल्वे स्थानकांचा होतोय विकास

On: June 8, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून नाशिक परिसरातील पाच महत्त्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात आली आहे. भुसावळ विभागामार्फत कुंभमेळा तयारीसाठी देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर रेल्वे पायाभूत सुविधा विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून लाखो भाविक रेल्वेने येण्याची अपेक्षा असल्याने प्रवासी हाताळणी क्षमता वाढवणे, रेल्वे संचालनात अधिक लवचिकता आणणे, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करणे तसेच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही कामे केली जात आहेत.

विविध स्थानकांवर प्रस्तावित प्रमुख पायाभूत सुविधा विकास कामांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :

* अतिरिक्त प्रवासी प्लॅटफॉर्मची उभारणी

* यार्ड पुनर्रचना कामे

* इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची स्थापना

* अतिरिक्त लूप लाईन्स व स्टेबलिंग लाईन्सची निर्मिती

* रॅम्पसह फूट ओव्हर ब्रिज

* प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेड/आच्छादन

* प्रवासी प्रतीक्षा क्षेत्र

* स्थानक परिसरातील परिसंचरण क्षेत्राचा विकास

* पाणीपुरवठा सुविधांचा विस्तार

* स्वच्छतागृहे व स्वच्छता सुविधांची उभारणी

* सांडपाणी प्रक्रिया केंद्रे

* रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व कार्यकारी इमारती

ही सर्व कामे कुंभमेळ्या दरम्यान भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि अधिक दर्जेदार रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

देवळाली स्थानक –

देवळाली स्थानकावर एकाच वेळी अनेक महत्त्वाची कामे सुरू आहेत. यामध्ये अतिरिक्त उच्चस्तरीय प्रवासी प्लॅटफॉर्मचे बांधकाम, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामे, स्टेबलिंग सुविधा, १०० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रॅम्पसह फूट ओव्हर ब्रिज आणि होल्डिंग एरियांचा विकास यांचा समावेश आहे. ७३ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मार्गांशी संबंधित कामे प्रगतीपथावर आहेत. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि ऑब्जेक्ट कंट्रोलर इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून, तळमजला आधीच सिग्नल व दूरसंचार विभागाकडे उपकरणांच्या स्थापनेसाठी आधीच हस्तांतरित करण्यात आला आहे. सुमारे ५५५ मीटर लांबीच्या अप आणि डाऊन दिशेच्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू आहे. दोन्ही टोकांवरील फूट ओव्हर ब्रिजचा पाया आणि रॅम्पची कामेही प्रगतिपथावर आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामात ड्रेनेज पाइपलाइन टाकणे, इक्वलायझेशन टँक, प्रक्रिया केलेल्या पाण्याची टाकी, पंप हाऊस आणि सांडपाणी प्रक्रिया युनिटची स्थापना यांसारखे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. कुंभ मेळा संचालनाच्या नियोजनाचा भाग म्हणून अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन, सिक लाईन्स, गँग हट, ट्रॅक मशीन हट आणि कर्मचारी निवासस्थानांचे बांधकामही सुरू आहे.

नाशिक रोड स्थानक –

कुंभ मेळ्यासाठी नाशिक रोड स्थानकाचा विकास प्रवासी हाताळणी केंद्रांपैकी एक म्हणून केला जात आहे. या अंतर्गत १२ मीटर रुंद आणि ६ मीटर रुंद अशा दोन फूट ओव्हर ब्रिजचे बांधकाम, विद्यमान प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नूतनीकरण व सुधारणा, प्लॅटफॉर्मवरील कवर ओवर शेडच्या क्षेत्रफळात वाढ, अतिरिक्त पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छतागृहे आणि स्थानकाच्या परिसरातील सुधारणा यांचा समावेश आहे. विशेषतः शाही स्नान आणि इतर प्रमुख स्नानदिवशी अपेक्षित असलेल्या मोठ्या भाविक गर्दीचा विचार करून गर्दी नियंत्रण, प्रवाशांची सुरक्षित हालचाल यावर विशेष भर दिला जात आहे.

ओढा स्थानक –

ओढा स्थानकावर यार्ड तसेच प्रवासी सुविधांच्या विकासाची महत्त्वाची कामे सुरू आहेत. स्थानकाचा विकास अतिरिक्त लूप लाईन्स, सहा स्टेबलिंग लाईन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामे, फूट ओव्हर ब्रिज, कवर ओवर शेड कामे आणि होल्डिंग एरिया यांच्या उभारणीसह करण्यात येत आहे. ओढा स्थानकासाठी आवश्यक जमीन संपादन प्रक्रियेत लक्षणीय प्रगती झाली आहे. सुमारे ३.४३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, १९ मे २६ रोजी संबंधित जमिनीचा ताबा घेण्यात आला आहे. याशिवाय, अतिरिक्त ०.१ हेक्टर जमिनीच्या पूरक संपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. संपादित तसेच प्रस्तावित जमिनीच्या क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे

खेरवाडी स्थानक –

कुंभ मेळा संचालनादरम्यान कार्यक्षम रेल्वे संचालन आणि प्रवासी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने खेरवाडी स्थानकाचा विकास केला जात आहे. या कामांमध्ये आयलंड प्लॅटफॉर्मचा विकास, अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स, रॅम्पसह फूट ओव्हर ब्रिज, स्थानक परिसरातील परिसंचरण क्षेत्राचा विकास तसेच विविध प्रवासी सुविधांचा समावेश आहे. खेरवाडी येथील जमीन संपादनाची कामेही प्रगतीपथावर आहेत. यापूर्वी संपादित केलेल्या जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अतिरिक्त जमिनीसाठी पूरक जमीन संपादन आणि फेरफार प्रक्रिया सुरू आहे. यार्ड पुनर्रचना आणि क्रॉसओव्हरशी संबंधित कामांचे नियोजन सिग्नलिंग, विद्युत आणि ऑपरेटिंग विभागांच्या समन्वयाने केले जात असून, कामांच्या अंमलबजावणीदरम्यान रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेतली जात आहे.

कसबे सुकणे स्थानक –

कुंभ मेळ्या दरम्यान वाढीव प्रवासी वाहतूक हाताळण्यासाठी कसबे सुकणे स्थानकाचाही सर्वांगीण विकास केला जात आहे. येथील कामांमध्ये अतिरिक्त लूप लाईन्स व स्टेबलिंग लाईन्स, फूट ओव्हर ब्रिज, प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्म विकास आणि होल्डिंग एरियांची उभारणी यांचा समावेश आहे. कसबे सुकणे येथील जमीन संपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाच्या समन्वयाने सुरू आहे. संयुक्त मोजणी नोंद संबंधित कामे पूर्ण झाली असून, फेरफार आणि जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून प्रस्तावित जमीन संपादन क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

प्रवासी सुविधा आणि होल्डिंग एरिया

कुंभ मेळ्याच्या गर्दीच्या दिवसांमध्ये प्रभावी गर्दी व्यवस्थापनासाठी सर्व पाच स्थानकांवर स्वतंत्र प्रवासी होल्डिंग एरिया विकसित केले जात आहेत. याशिवाय, प्रत्येक स्थानकावर अतिरिक्त स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा सुविधा, परिसंचरण क्षेत्र आणि वाहतुकीच्या जागा तसेच प्रवासी निवारा शेड्स उभारण्यात येत आहेत.अतिरिक्त उंचावरील आणि भूमिगत पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाद्वारे पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ करण्यात येत आहे. सर्व प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त स्वच्छतागृहे आणि कवर ओवर शेड क्षेत्रांचाही विकास केला जात आहे.

विविध विभागांच्या समन्वयातून कामांची अंमलबजावणी –

मध्य रेल्वेने स्थापत्य, ट्रॅक, सिग्नल व दूरसंचार, ट्रॅक्शन वितरण आणि विद्युत विभागांची कामे टप्प्याटप्प्याने आणि परस्पर समन्वयाने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. नॉन-इंटरलॉकिंग नियोजन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामे, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग कामे, ट्रॅक लिंकिंग आणि विद्युत सुधारणा यांचा परस्पर समन्वय साधून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, तसेच रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेतली जात आहे. कुंभ मेळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी विभागीय स्तरावर सातत्याने आढावा आणि देखरेख केली जात आहे.

व्यापक तयारी

२०२७ मधील शाही स्नान काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात लाखो भाविक येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या व्यापक पायाभूत सुविधा उन्नतीकरणाद्वारे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने देशातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभ मेळ्यादरम्यान भाविक आणि प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment