Nashik News: तरुण लोकसंख्या ही भारताची मोठी ताकद आहे. आज त्यांना अनेक संधी खुणावत असल्या तरी त्यांच्यापुढे मोठी आव्हानंदेखील आहेत. त्यामुळे नवोन्मेष आणि उद्योजकता यांची जी गरज आहे, त्यामध्ये पारंपारिक कामगारवर्ग आणि नवोपक्रमावर आधारित कामगारवर्ग असा हा संघर्ष असणार आहे. आपल्याकडे अनेक समस्या असल्याने इनोव्हेशन म्हणजेच नवोन्मेषासाठीही मोठ्या संधी आहेत. त्यासाठी तरुणांनी धाडस करून पुढे येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन मुंबई येथील आयआयएम या संस्थेचे माजी कार्यासन अधिकारी विजय तळेले यांनी येथे केले.
तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत त्यांनी श्रीमती निर्मला केशव गरुड स्मृती व्याख्यानात ‘तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती’ या विषयावर 27 वे पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. विवेक गरुड, अमित गरुड, सपकाळ नॉलेज हबचे राकेश घुगे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. निर्मला गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. संगीता बाफणा आणि हेमंत देवरे यांनी स्वागत केले. यावेळी रिया राज आणि शंतनु बिरारी या सोशल मीडिया इन्फ्लुयर्सचा सत्कार करण्यात आला. रूचिता ठाकूर यांनी त्यांचा परिचय करून दिला.

दरम्यान, व्याख्यानांसोबतच यंदा नाशिककरांना स्थानिक प्रतिभावान आणि नवोदित चित्रकारांच्या चित्रकृतींचाही आस्वाद घेता येत आहे. या मालिकेत आज अपर्णा दशपूते यांचा कलाविष्कार अनुभवता आला. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तळेले म्हणाले की, आपला स्वतःचा काही तरी व्यवसाय असावा असा विचार करणारी आजची तरुण पिढीच उद्याच्या विकसित भारताला हातभार लावणार आहे. दुसरीकडे झपाट्याने वाढणारे तंत्रज्ञान, जागतिक स्पर्धा, नवोन्मेषाची गरज आणि तरुणांची वाढती भूमिका या पार्श्वभूमीवर आपण महासत्ता बनण्याची स्वप्नं बघत आहोत. त्याचवेळी नाविन्याची कास न धरल्याने अनेक कंपन्या, व्यवसाय बंद पडल्याची काही उदाहरणंही त्यांनी यावेळी दिली.
आपण गेल्या 12 ते 15 वर्षांत इनोव्हेशनमध्ये खूप प्रगती केली. ही आशादायक बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. ते म्हणाले की आपल्याकडे असलेल्या प्रत्येक समस्येवर आपण या नवोन्मेषातून मार्ग काढू शकतो. त्याचप्रमाणे नवोन्मेषाचे इंजिन, रोजगार निर्मिती, आर्थिक वाढ यासारख्या गोष्टींमुळे येत्या 25 वर्षांत आपल्याला स्टार्टअपची गरज असल्याचेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर 2016 मध्ये 600 स्टार्टअप सुरू झाले आणि आता 2026 मध्ये त्यांची संख्या 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. यामध्ये आपला देश जगातील दुसरी इकोसिस्टिम आहे. त्यामुळे सरकारचं पाठबळ आणि जागतिक गुंतवणुकदारांचं आपल्याकडे लक्ष असल्याने भविष्यात ही इकोसिस्टिम किमान 50 पटीने वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तरोत्तर रंगत गेली ‘रोमँटिक किशोर’मैफल
व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या सत्रांत सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत ‘ रोमँटिक किशोर’ हा किशोर कुमार यांच्या गाजलेल्या रोमँटिक गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये प्रशांत चंद्रात्रे, नमिता राजहंस, राधा जोशी, कीर्ती कोल्हे, पल्लवी मयाचार्य, अनघा निमगावकर तसेच संजय गाडे यांनी विविध लोकप्रिय गीतं सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या रोमँटिक मैफलीत श्रोते तल्लीन झाले होते.









