होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आपली अभिजाततेची संकल्पना ही मराठीपुरती अधिक व्यापक: किरण कुलकर्णी

On: May 31, 2026 2:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: भाषेची अभिजातता ही मुळात आपल्याकडील संकल्पना नाही. त्याचप्रमाणे याबाबत विविध विचारप्रवाह आहेत. मात्र आपल्या मराठीपुरती ही संकल्पना आपण अधिक व्यापक स्वरूपात स्वीकारली आहे. तसेच मराठीला 216 बोलीभाषा असणे हे वैशिष्ट्य आहे. पण या बोलीभाषा मराठीच्या फांद्या नसून, ती मराठीची मुळं आहेत आणि त्यावरच अख्खी भाषा उभी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी येथे केले.

तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आणि स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृती व्याख्यानात ‘अभिजात मराठी- विविध पैलू आणि भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. विकास गोगटे आणि उद्योजक विवेक गोगटे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्व. डॉ. गोगटे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्राचार्य वा. न. भेंडे, यांनी स्वागत केले. दरम्यान, व्याख्यानांसोबतच यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात संगमनेर येथील प्रथितयश चित्रकार प्रशांत सोमवंशी यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच सोशल मिडिया इन्फ्ल्यूएंसर अँकर शिल्पा भेंडे आणि प्रसाद जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. रूचिता ठाकूर यांनी परिचय करून दिला. कुलकर्णी म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा जगभरातील मराठीप्रेमींनी आनंद व्यक्त केला. परंतु अभिजात म्हणजे काय हा मुद्दा अजूनही स्पष्ट झालेला नाही, असे सांगत त्यांनी या संकल्पनेचा संपूर्ण इतिहास, नव्या युगात अभिजाततेची व्याख्या आदींबाबत समर्पक माहिती दिली. म्हणजे मराठीचे रूप आता बदलले असले तरी प्रवाह मात्र तोच आहे.

मराठी प्राकृत आणि मध्य युगिन मराठीच्या स्वरूपाचे दाखलेही त्यांनी दिले. आजची नवीन पिढी नवनवीन शब्द मराठीत आणू पहात आहे. ते आपण स्वीकारले पाहिजे. कारण समाज जर एखादा निर्णय घेत असेल तर त्याला कुणीही रोखू शकत नाही. म्हणुनच भाषेचा विकास देखील समाजाच्याच हाती असतो, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी डिजिटल मराठी या मुद्यावरही सविस्तर विवेचन केले. मराठी भाषेची अनेकप्रकारची वैशिष्ट्य सांगता येतील, असेही ते म्हणाले. ही वैशिष्ट्ये जपण्यासाठी, भाषेचा विकास करण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी आपला भाषा विभाग मोठ्याप्रमाणावर काम करत आहे.

डिजिटल मराठीसाठी आपणही योगदान देऊ शकतो, त्यासाठी आपल्या मोबाईलवर मराठीत टाईप करण्यासारखे प्रयोग सतत केले पाहिजे. असे योगदान मिळाल्यास मराठीचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाषा विभागाच्या कामाचे स्वरूप समजण्यासाठी उदाहरणच द्यायचे तर नुकतेच आपण तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त पौथ्याचा सर्व्हे आणि नोंद ज्ञान भारतवर असल्याचे त्यांनी नमुद केले. मात्र या कामात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

विश्व मराठी संमेलनाच्या पहिल्याच बैठकीत ठरल्याप्रमाणे वसंत व्याख्यानमाला येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात जिल्ह्यातील 15 तालुक्यांत तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करणार असल्याचे बेणी यांनी यावेळी जाहीर केले. त्यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव कुलकर्णी यांना यावेळी देण्यात आला. त्यावर शासनातर्फे नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतही असे उपक्रम कसे राबवता येतील यासाठी आपल्याला हा चांगला मुद्दा मिळाल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

‘नीलग्रीवा’ने उलगडले कथ्थकचे विविध पैलू

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रांत नीलग्रीवा कला केंद्र प्रस्तुत ‘कथ्थक नृत्याचे विविध पैलु’ या कथ्थक नृत्याची महती आणि माहिती देणाऱ्या विशेष सादरीकरणात सान्वी कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यांनी धिं नक नक धिं… हा स्वा. सावरकर यांच्या गितांवर आधारित कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातून कला, संस्कृती आणि संस्कार यांची सशक्त सांगड घालत त्या माध्यमातून सावरकरी प्रतिभेचे विविध रंग दर्शविण्यात आले. या रोमांचक आणि प्रेरणादायी सादरीकरणास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment