Jalgaon News: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असून जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत रंगत वाढली आहे, भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून भाजपचे उमेदवार म्हणून नंदकिशोर महाजन यांनी आज अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुकीसाठी उमेदवारीचे चित्र जवळपास स्पस्ट झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अनुपस्थिती महायुतीत सर्व काही ठिक नसल्याचे संकेत तर देत नाही, अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेत महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन करतांना जळगाव जिल्ह्यात महायुती अधिक बळकट व्हावी तसेच विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वांनी संघटितपणे आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीनंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नंदकिशोर महाजन यांचा शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तत्पूर्वी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण युतीमय झाले.

महायुतीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आगामी निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिता वाघ, मंत्री गुलाबराव देवकर, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण, जळगाव शहरचे आ. राजू भोळे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, महापौर दीपमाला काळे यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख राजकारण करण्याचे संकेत दिले.









