Sharad Pawar Statement: नीट पेपर फुटी प्रकरण देशभर गाजत आहे, या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला. आता नीट पेपरफुटी प्रकरणी शरद पवार म्हणाले की, परीक्षेत एआय (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असता तर हा घोटाळा टाळता आला असता. त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रामाणिक म्हटले आणि दोन महिन्यांत तपासात सुधारणा झाल्याचा दावा केला, तर दुसरीकडे सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.
देशभरात नीट वरून अद्याप वादंग शमलेले नाही. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) प्रमुख शरद पवार यांनी या संकटावर एक मोठे विधान केले आहे. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) घेताना तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वेळेवर वापर केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती.

एआयने पेपरफुटी टाळता आली असती
पवार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा टाळता आला असता. जर हे काम आधीच झाले असते, तर देशाला आज या परिस्थितीचा सामना करावा लागला नसता. एआयबद्दल बोलताना पवार म्हणाले की, ते कृषीपासून आरोग्यसेवेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणत आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात एआयचा अवलंब करण्याच्या प्रयत्नांना गती दिली पाहिजे. एनटीए (NTA) मधील सध्याच्या घडामोडींवर बोलताना, शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा बचाव केला. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर हे प्रकरण हाताळण्यासाठी नेमलेल्या व्यक्तीने यापूर्वी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या कामाचे परिणाम पुढील दोन महिन्यांत दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेपरफुटीच्या आरोपांनंतर ३ मे रोजी होणारी नीट (यूजी) २०२६ परीक्षा १२ मे रोजी रद्द करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत असून, आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार आहे. या वादानंतर, केंद्र सरकारने एनटीए (NTA) मध्ये मोठे प्रशासकीय बदल करत अनुजा बापट (आयएसएस) आणि रुचिरा विज (आयआरएस) यांची नवीन सहसचिव म्हणून नियुक्ती केली. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. याच मुद्यावरून कॉकरोच जनता पार्टी सोशल वरून रस्त्यावर उतरली आहे.









