Pune News: पुणे आणि पिंपरी चिंचवड दारू भेसळ प्रकरण राज्यभर गाजत असून यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रात संशयित भेसळयुक्त दारूचा अवैध पुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण सुमरे २० वर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात भेसळयुक्त दारू पिल्याने किमान १४ जणांना आपले जीव गमवावे लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तस्करासह आठ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात संशयित भेसळयुक्त विषारी दारू पिल्याने १० जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातील हडपसरच्या पांढरे माळा परिसरात आणखी चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, इतर पाच जणांवर पिंपरी-चिंचवडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनीही विषारी दारू प्यायल्याचा संशय आहे.

या घटनेची गंभीर दाखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, हडपसर परिसरात भेसळयुक्त दारूचा कथित अवैध व्यापार आणि पुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल हडपसर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगळे, सहायक पोलीस निरीक्षक हसीना सिकलागर आणि उपनिरीक्षक हसन मुलानी यांना निलंबित करण्यात आले आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दापोडी पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचाऱ्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील सहा अधिकाऱ्यांनाचे ही निलंबन झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानेही तीन निरीक्षक, सहा उपनिरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांसह १३ जणांना निलंबित केले आहे, असे उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानाडे यांनी सांगितले.









