Mumbai News: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी राज्य उत्पादन विभाग आणि शासनाचे तोंड पोळले असून आता शासनाने मिथेनॉल चा परवाना असलेल्या संस्थांची झाडाझडती सुरू केली आहे. उशिरा का होईना या कारवाईचे स्वागत होत असून त्यात तुकाराम मुढे यांच्या सारख्या अधिकाऱ्याकडे अन्न-औषध प्रशासनाचा पदभार दिल्याने भेसळ करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर पुढील ७ दिवसात पूर्ण कराव्यात आणि कायदा व नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन बाबत ३ जून अखेर एकूण २२६ तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. ५१ बंद करण्यात आल्या आहेत. तसेच उल्लंघन आढळलेल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. औषधी वनस्पती पासून प्राप्त होणारे विषारी द्रव्यांचा उपयोग औषधांचे उत्पादनात होत असल्याने व सदर विषारी द्रव्ये महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ च्या अनुसूचिमध्ये समाविष्ठ असल्याने सदर नियमाखाली परवाने मंजुरी प्राधिकार १९७७ मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आले आहेत. संबधित कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (औषधे) परवाने मंजुरी प्राधिकारी आहेत.
राज्यातील सर्व घाऊक -किरकोळ मिथेनॉल परवाने धारकांनी, विषारी द्रव्ये, १९१९ व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ अंतर्गत नियम व परवान्याच्या अटींचे तंतोतत पालन करावे. नियमांचे उल्लघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, विषारी द्रव्ये अधिनियम व भारतीय न्याय संहिता, २०२३ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध शासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. औषधांच्या बाबतील बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था वा व्यक्ती आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी म्हटले आहे.

विषारी द्रव्ये म्हणून मिथेनॉलचा अंतर्भाव
महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) मधील अनुसुचिमध्ये नमुद विषारी द्रव्याचा वापर औषधांत करणे बंद झाले. त्यानुसार कोणतेही औषधाचे उत्पादक, घाउक किंवा किरकोळ औषधी विक्रेत्यांकडे या द्रव्याची उत्पादन, विक्री किंवा वितरणाकरीता साठवणूक करण्यात येत नाही किंवा परवाना घेतला जात नाही. त्यामुळे सन १९९२ मध्ये सर्व विषारी द्रव्ये १९७२ अनुसुचीमधून काढून टाकण्यांत आली व केवळ ७ विषद्रव्ये कायम ठेवण्यात आले.
विषारी द्रव्याचे आयात, साठवणूक व विक्री या वरील नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या विषारी द्रव्य अधिनियम, १९१९ कायद्यातील तरतुदीनुसार व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ कायदयाअंतर्गत प्राधिकार व अंमलबजावणीचे अधिकार गृह विभागाकडे देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात पोलीस आयुक्त पद नसेल तेथे जिल्हा दंडाधिकारी यांना परवाने प्राधिकार देण्यात आले आहेत.
रेक्स इंटरनॅशनल कंपनीचा परवाना रद्द
पुणे विषारी दारू प्रकरणात मिथेनॉलचा पुरवठा करण्यात सहभागी असलेल्या रेक्स इंटरनॅशनल भिवंडी या संस्थेविरुद्ध आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी धडक कारवाही केली असून ५ हजार २२९ किलो संशयित मिथेनॉल या विषारी द्रव्याचा ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा साठा नमुने चाचणीसाठी घेऊन जप्त केला आहे व गाळा सील करण्यात आला आहे.
परवाने रद्द करण्यास नोटीस बजाविण्यात आली असून मालक श्री अरुण कुमार चौबे व अभिषेख चौबे यांचे विरुद्ध नारपोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र.५२१/२०१६ दाखल करण्यात झाला आहे.









