Jalgaon News: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आलेले असून आज, दि. ८ एप्रिल रोजी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकुर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हयातील विविध वृत्तपत्रांचे, इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सप्ताहाच्या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी भेट देऊन सप्ताहाची रुपरेषा जाणून घेतली आणि या सप्ताहास शुभेच्छा दिल्या.
दि. ९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचांरावर तसेच, सन २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रह आणि मानवी हक्कांचे महत्व पटवून देणारे व्याख्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला मुलींचे शासकीय वसतिगृह जळगांव येथे करण्यात आले आहे. यावेळी मिलिंद बागुल, जयसिंग वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत.
दि. १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’या योजनेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असुन यामध्ये या योजनेचा प्रचार प्रसार आणि ही योजना युवकांसाठी कशी उपयुक्त राहील यासंदर्भाात जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी जिल्हयातील महिलांसाठी मेळाव्याचे सुध्दा आयोजन करण्यात आलेले आहे.. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या बचत गटातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
दि. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्ताने मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगांव येथे विविध कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि. १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागती शिबिर, व मेळाव्याचे आधार ज्येष्ठ नागरिक संघ एसएमआयटी कॉलेज जवळ जळगांव येथे आयोजन करण्यात आलेले असून ज्येष्ठांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी शहरातील नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.नितीन धांडे मार्गदर्शन करणार आहेत.
दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतुन जमीन वाटप करण्यात आलेल्या शेतक-यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेंडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य तसेच शेतक-यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत श्री, कुरबान तडवी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहे.सप्ताहाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.







