Nashik News: कांदा दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्यास बाजारात अल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष आता विविध स्वरुपाच्या आंदोलनांच्या माध्यमातून बाहेर पडू लागला आहे.
नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे कांदा दरात घसरण झाल्यास आंदोलनाची पहिली ठिणगी नाशिक जिल्ह्यातच पडते. त्याचाच अनुभव पुन्हा एकदा आला आहे. कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नांदगाव तालुक्यातील कांदा उत्पादक संतप्त झाले. शेतकऱ्यांनी नांदगाव येवला मार्गावर ठिय्या दिला. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.
सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 700 ते 1050 रुपये इतकाच भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. बियाणे, खते, औषधे, मजुरी, वाहतूक यांचा वाढलेला खर्च लक्षात घेता मिळणारा दर हा अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असून आर्थिक संकटात सापडले आहेत. नांदगाव बाजार समितीसमोर एकत्र येत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व कांदा उत्पादक शेतकरी निलेश चव्हाण, विशाल वडघुले यांनी केले.
कांद्याला हमीभाव जाहीर करावा, विक्री केलेल्या कांद्यावर तात्काळ अनुदान द्यावे, तसेच कांदा निर्यातीवरील शुल्क शून्य करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. कांद्याचे निर्यातमूल्य शून्य झाले पाहिजे, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.










