jalgaon News: शहर हद्दीत मानराज पार्क परिसरात गुरुवारी दुपारी कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी रिक्षा कारवर जोरात आदळल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून बांभोरीच्या दिशेने (एमएच-१२ टीवाय-१७६२) क्रमांकाची बलेनो कार जात होती. शहरातील मानराज पार्क परिसरात आल्यानंतर कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने वाहन रस्त्यातच थांबले. त्याचवेळी भरधाव वेगाने येत असलेली (एमएच-19 सीडब्ल्यू-6877) क्रमांकाची रिक्षा कारवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

दरम्यान अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षामध्ये अडकलेल्या चालकासह एका महिला प्रवाशाला बाहेर काढत त्यांना नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघातात रिक्षाचालक आणि पाळधी येथील महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान,दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. मात्र अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान या भीषण धडकेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली कार आणि रिक्षामधील धडक अत्यंत भीषण असतानाही मोठी जीवितहानी टळली. मात्र रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून कारचे देखील थोडे नुकसान झाले आहे.








