Jalgaon News: शहराचा स्वच्छता दर्जा सुधारण्यासाठी आणि नागरिक व महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी आता प्रत्येक प्रभागात ‘स्वच्छता दूत’ नियुक्त केले जाणार आहेत. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेत आयोजित केलेल्या विविध सामाजिक संस्थांच्या बैठकीत याची माहिती दिली..शहरातील स्वच्छतेविषयी काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी महापौरांनी स्वच्छतेबाबतचे आगामी नियोजन मांडले. (jalgaon Clean Campaign)
प्रभागातील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी स्वच्छता दूत दुवा म्हणून काम करतील. स्थानिक नगरसेवकांना या मोहिमेत जोडून घेऊन स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे कसे करता येईल, याचे नियोजन करण्यात येत आहे. विशेषतः या कामात तरुणांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना
दंडात्मक कारवाई: उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना बैठकीत मांडण्यात आली. तसेच प्रभागाची स्वच्छता राखणाऱ्या जागरूक नागरिकांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात यावे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून तो ओला आणि सुका अशा स्वरूपातच द्यावा, असे आवाहन करण्यात आले. ज्या ठिकाणी भाजी बाजार भरतात, त्या ठिकाणी मोठ्या कचराकुंड्या आणि कंटेनर ठेवण्यात यावेत.
‘वेंगुर्ला पॅटर्न’वर चर्चा
या बैठकीत कल्याण येथील ‘मनुसृष्टी’ संस्थेच्या वैशाली तांबट यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या यशस्वी ‘स्वच्छता मॉडेल’ची (वेंगुर्ला पॅटर्न) माहिती दिली. शहरात कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे अधिक सक्षम करता येईल, यावर त्यांनी सादरीकरण केले. या बैठकीला महानगरपालिकेच्या पर्यावरण व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागातर्फे लवकरच या मोहिमेची सविस्तर कार्यप्रणाली स्पष्ट केली जाणार आहे. तसेच, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत ‘बीव्हीजी’ कंपनीला अधिकार देण्याविषयी महापौरांनी सकारात्मकता दर्शवली आहे. जळगाव शहराला कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (jalgaon Clean Campaign)







